तळणी : जोपर्यत या प्रकरणातील आरोपींना पोलीस पकडत नाहीत, तोपर्यंत मृत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेत सोमवारी जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच पोलीस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांना निवेदन दिले.मंठा तालुक्यातील तळणी येथील वृध्द दाम्पत्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगताना रविवारी सकाळी ९ वाजता आढळून आला. या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त करत जिल्हा पोलीस अधिक्षक येणार नाही. तोपर्यत मृतदेह बाहेर काढणार नाही, असा पवित्रा नातेवाईकानी घेतला होता. दुपारी ४ वाजता परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईकांना चर्चा करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करु न दोषीवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मृतदेह विहिरीबाहेर काढले. पण आधी कारवाई करा. असे सांगत शवविच्छेदनास नेण्यास विरोध केल्याने रात्री ९ वाजेपर्यत मृतदेह घटनास्थळीच होते. रात्री ९ वा.पोलीस बंदोबस्तात शवविच्छेदनासाठी मृतदेह मंठ्याला पाठविण्यात आले. सोमवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. परंतु शेतीच्या वादातून वृध्ददाम्पत्याचा खून करण्यात आला आहे. जोपर्यंत पोलीस संशयीत आरोपींना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही, तोपर्यंत वृध्ददाम्पत्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या देऊन कारवाईची मागणी केली. तसेच मंठ्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बागुल हे कारवाईत चालढकल करत असल्याचा आरोप करुन त्यांना निलंबित करण्याची मागणी नातेवाईकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
आरोपींना पकडा...अन्यथा मयत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार नाही
By admin | Published: January 31, 2017 12:22 AM