लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मोकाट श्वान नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. माणसांच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही. कडक नियम बाजूला ठेवून मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावाच लागेल. शहरात नागरिकांना ठेवा किंवा श्वानांना, असे म्हणायची वेळ आली आहे. येत्या आठ दिवसांत मनपा प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार करून निर्णय घ्यावा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज सर्वसाधारण सभेत प्रशासनाला दिले.सोमवारी सकाळी ११.३० वाजता नियमित सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी मोकाट श्वानांचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील सर्वच पक्षांतील नगरसेवकांनी मिळून प्रशासनावर हल्लाबोल केला. किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत एकाच रात्री तब्बल १८ मुलांचे लचके मोकाट श्वानांनी तोडले होते.शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही श्वान चावण्याचे प्रकार सुरूच आहेत. नारेगाव भागातील कोणत्याही रस्त्यावर रात्री ११ नंतर दुचाकी चालवून दाखवावी त्याला ५० हजारांचे बक्षीस देतो असे नगरसेवक राजू शिंदे यांनी सांगून विषयाचे गांभीर्य नमूद केले. कालपर्यंत औरंगाबादकर श्वानांचा त्रास सहन करीत होते. आता वराहांचीही संख्या चारपटीने वाढली आहे.मोहम्मद इर्शाद यांनी आपल्या वॉर्डातील पिसाळलेल्या श्वानाच्या हल्ल्यानंतरचा तपशील नमूद केला. ज्या मुलांवर हल्ले झाले त्यांचे काय हाल सुरू आहेत, त्यावर सविस्तर प्रकाश टाकला. अज्जू पहेलवान यांनी अर्थसंकल्पात श्वानांवर होणा-या खर्चाची तरतूद करावी, असा सल्ला दिला. अर्चना नीळकंठ, समीना शेख, बन्सी मामा, ज्योती पिंजरकर यांनीही सभागृहातील चर्चेत भाग घेतला. सभागृहनेता विकास जैन यांनी कायम बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:02 AM