औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर परिणामकारक समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार करणारी एक टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. विशेष म्हणजे, यात जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे.मंदार भालेराव ( २९, शिवाजी नगर) , अभिजित नामदेव तौर व घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल ओमप्रकाश बोहते अशी आरोपींची नावे आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने नागरिक बाधित होत आहेत. यामुळे गंभीर बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक वाटेल ते करून हे इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन काहींनी रेमडेसिविरचा काळाबाजार सुरु केला आहे. दरम्यान, दरम्यान, पुंडलिकनगर पोलिसांना काळाबाजारात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याऱ्या मंदार भालेराव या व्यक्तीची माहिती खबऱ्यांच्यामार्फत मिळाली. मंदार भालेराव रेमडेसिविरचे एक इंजेक्शन १४ ते १५ हजारात विकत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सोबत घेत सापळा रचला. यानुसार, गुरुवारी संध्याकाळी पथकाने मंदार यास इंजेक्शनसाठी फोन केला. त्याने सूतगिरणी चौकात बोलावून त्यांच्याकडून १५ हजार रुपये घेऊन तीन तासात इंजेक्शन सांगेल त्या ठिकाणी आणून देतो असे सांगितले.
यानंतर सपोनि जि. बी. सोनवणे, पोह रमेश सांगळे आणि औषध निरीक्षक आर. एम. बजाज यांनी त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी मंदार याने गुन्ह्याची कबुली दिली. जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल बोहते याने तीन रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. तसेच इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अभिजित नामदेव तौर याचा सुद्धा सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच कारवाई करत त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शनस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत.