औरंगाबाद : नशेखोरांच्या दुनियेत उच्चप्रतीचे ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅफेड्रोनसह नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या एका रिक्षाचालकाला पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून पकडले. या आरोपीकडून २८ मिली ग्रॅम मॅफेड्रोन (एम.डी.) पावडर, दोन वेगवेगळ्या कंपनीच्या नशेच्या गोळ्या आणि मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे ३ हजार ३४५ रुपयांचा ऐवज जप्त केला. मोहसीन अली हाश्मी अय्युब अली हाश्मी (वय ४२,रा. आनंदनगर, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
रेल्वेस्टेशन परिसरातील जहांगीरदार कॉलनीत एकजण नशेच्या गोळ्या विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे यांना दिली. यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली रोडे, हवालदार सय्यद शकील, इमरान पठाण, ए. आर. खरात, विजय निकम, विठ्ठल आढे, व्ही. एस. पवार, चौधरी यांनी औषधी निरीक्षक जीवन जाधव यांच्यासह आरोपीला पकडण्यासाठी रेल्वेस्टेशन परिसरात धाव घेतली.
चार वाजेच्या सुमारास साई ट्रेडसमोर संशयित आरोपी पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्यास घेरले व ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ ११२० रुपये किमतीचे प्लास्टिक पिशवीत मॅफेड्रोन पावडर, ५४५ रुपये किमतीच्या नायट्रोसनच्या १०० औषधी गोळ्या, अलफ्राकान .५ या २०० औषधी गोळ्या आणि मोबाईल सापडला. या गोळ्या नशेसाठी वापरल्या जातात. आरोपी नशेखोरांना औषधी गोळ्यांची विक्री करणार होता. शिवाय त्याच्याजवळ सापडलेले एम.डी. हे ड्रग त्याने स्वत:साठी आणले अथवा विक्री करण्यासाठी हे अद्याप समजू शकले नाही. हे ड्रग अत्यल्प आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.