सिल्लोड : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या कामासाठी अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे दोन विना क्रमांकाचे हायवा महसूल विभागाने कारवाई करीत जप्त केले आहेत. तलाठी
भगतसिंग पाटील यांनी ही कारवाई केली असून, दोन हायवा अजिंठा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. महसूल कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
अनाड रस्त्यावरून एका खदानीतून हे मुरूम रस्त्याच्या कामासाठी जात होते. सदर मुरमाची रॉयल्टीबाबत चालकाला विचारणा केली असता त्याच्याकडे रॉयल्टी नसल्याने सदर कार्यवाही करण्यात आली. औरंगाबाद जळगाव महामार्गाचे सिमेंटीकरणाचे रखडलेले काम या ना त्या कारणाने गाजत आहे. ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सध्या संथगतीने सुरू असून, या कामासाठी एका ठेकेदाराकडून चक्क विना क्रमाकांचे हायवा रात्री-बेरात्री सर्रासपणे वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अजिंठा सजाचे तलाठी भगतसिंग पाटील व कोतवाल राजू पवार यांच्या नजरेस हे हायवा पडताच त्यांनी हायवा थांबवून त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यांच्याकडे कुठलीच परवानगी आढळून न आल्याने पंचनामे करून कारवाई करण्यात आली.
वाहिलेले मुरमाचे पंचनामे होणार
सध्या परिसरात अवैधरीत्या मुरूम उपसा जोरात सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्री-बेरात्री सर्रासपणे मुरूम वाहण्याचे काम सपाट्याने सुरू आहे. चक्क विना क्रमाकांची वाहने त्यासाठी वापरण्यात येत आहेत. त्या मुरमाचेसुद्धा पंचनामे करणार असल्याचे तलाठी भगतसिंग पाटील यांनी सांगितले.
240521\img-20210524-wa0241_1.jpg
अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे दोन हायवा जप्त करण्यात आले.