औरंगाबाद : सोमवारी अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची दिवसभर खोडसाळपणे पसरलेली अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला आहे. कुलगुरूंच्या आदेशानुसार परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांनी शहरातील विविध चार परीक्षा केंद्रांमध्ये जाऊन मंगळवारी दिवसभर तेथील ‘सीसीटीव्ही’ फुटेजची तपासणी केली. संपूर्ण परीक्षा व्यवस्था ही ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखाली येते का नाही, याचीही त्यांनी चाचपणी केली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, मुंबई विद्यापीठ पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला कोणीतरी बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १३ मेपासून सुरळीतपणे सुरू आहेत. एकाही परीक्षा केंद्रावर अनुुचित प्रकार घडलेला नाही. ज्या केंद्रावर परीक्षेदरम्यान एखादा जरी प्रकार घडला, तर यापुढे त्या महाविद्यालयास परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. आज परीक्षा नियंत्रक डॉ. नेटके यांना शहरातील सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी सकाळपासूनच चौका येथील साई इन्स्टिट्यूट, चिकलठाणाजवळील साई इंजिनिअरिंग कॉलेज, सावंगी-नायगाव जवळील औरंगाबाद इंजिनिअरिंग कॉलेज तसेच नागसेनवन परिसरातील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयास भेटी दिल्या. त्या महाविद्यालयांमधील (परीक्षा केंद्र) स्ट्राँग रुम ते परीक्षा कक्ष हा सर्व परिसर ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखाली आहे का, परीक्षा कक्ष हादेखील ‘सीसीटीव्ही’च्या निगराणीखाली आहे का, याची तपासणी केली. शिवाय, काल सकाळपासून पेपर सुटेपर्यंतच्या काळातील फुटेजची तपासणी केली असून ते सर्व फुटेज विद्यापीठाला देण्याच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. उर्वरित परीक्षा केंद्रांना डॉ. नेटके हे उद्या बुधवारी भेटी देणार आहेत.
‘सीसीटीव्ही’ची तपासणी
By admin | Published: May 25, 2016 12:32 AM