औरंगाबाद : शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या सीमेवरील सतरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. लोकसहभागातून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅमेरे बसविले जात आहेत.
एक सीसीटीव्ही कॅमेरा चार पोलीस कर्मचाऱ्यांचे काम करू शकतो, असे म्हटले जाते. यामुळे काही वर्षांपासून पोलीस यंत्रणेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आग्रह असतो. गत महिन्यात शहरात मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना घडल्या. शिवाय पैशाच्या बॅगा पळविण्याचेही प्रकार घडले.
शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे खून, वाटमारीसह अनेक गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले होते. मात्र, शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगार सीसीटीव्ही नसलेल्या रस्त्याचा वापर करतात. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्याने शहराच्या बॉर्डवरील १७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेचीच मदत घेतली. लोकसहभागातून हे कॅमेरे बसविण्यात येत आहे.
जालना रस्त्यावरील केम्ब्रिज चौक, देवळाई चौक, पैठण रोड, नगरनाका, दौलताबाद टी पॉइंट, जटवाडा रोड, हर्सूल टी पॉइंट, पिसादेवी रस्ता, पळशी रस्ता, मांडकी रोड, सातारा गाव रस्ता आदी ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासोबतच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात साडेसातशे आणि दुसऱ्या टप्प्यात एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर सुरक्षित शहर म्हणून औरंगाबादची ओळख होणार आहे.