पाचोड : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी यंदाचा होळी व धूलिवंदनाचा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी केले, तर नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाचोडसह ग्रामीण भागातील काही गावात कोरोनाची रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेला होळी व धूलिवंदनाचा सण धूमधडाक्यात साजरा करणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन अगदी साध्या पद्धतीने सण साजरा करावा, असे आवाहन सुरवसे यांनी केले. धूलिवंदनाचा सण सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना रंग लावणे, पाणी टाकणे, गुलाल लावून उधळण करणे. मात्र, यंदा कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता होळी व धूलिवंदनाचा सण सार्वजनिकरीत्या साजरा न करता नागरिकांनी हा सण साध्या पद्धतीनेच साजरा करावा. पोलीस ठाण्यात पार पडलेल्या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, भगवान धांडे, हनुमान धनवे, नरेंद्र अंधारे, सुधाकर मोहिते व पत्रकारांची उपस्थिती राहणार आहे.