वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सोमवारी रक्तदान शिबीर, सप्ताह आणि पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. ओम नमो शिवायचा गजर, भक्तीमय वातावरण व भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसरात चैतन्य पसरले होते.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. जिवनात सुख, शांती मिळावी, सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून महाशिवरात्रीला भगवान महादेवाची भक्तीभावाने उपासना केली जाते. महाशिवरात्री निमित्त बजाजनगर, वाळूज, रांजणगाव येथील महादेव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बजाजनगरातील पंचमुखी महादेव मंदिरात किर्तन महोत्सव व शिवलीलामृत पारायण सोहळा, रक्तदान शिबीर, खिचडी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. श्यामसुंदर सोमानी यांच्या हस्ते अभिषेक पहाटे ४ वाजता अभिषेक झाल्यानंतर महादेव मूर्तीची व पिंडीची विधीवत पुजा करुन दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. दुपारी भागवत महाराज पाटील यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला.
सायंकाळी ओम नमो शिवायचा जयघोष व टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला-पुरुषांनी फुगडी व पावली खेळून सर्वांचे लक्ष वेधले. महिलांनी लोकमान्य चौकापासून मंदिरापर्यंत आकर्षक रांगोळी काढली होती. काशी विश्वनाथ महादेव मंदिरात शिवपारायण सोहळा व खिचडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. हर हर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिरात चिखडी वाटप करुन ह.भ.प. मीराबाई पाटील उचेकर यांच्या शिव किर्तनाने अखंड शिवनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली.
संजय ठिगळे, रवींद्र रेडे व संभाजी टोपे यांच्या हस्ते अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्री काशी केदारेश्वर महादेव मंदिरात भागवत कथा व किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वाळूज येथील शिवेश्वर महादेव मंदिर व रांजणगाव येथील शिव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.