औरंगाबाद : माहेश्वरी समाजाने महेश नवमीनिमित्त संयमतेचा उत्तम संदेश दिला. कोरोनामुळे बाजारपेठ अनलॉक असली तरी समाजाने स्वत:हून सरकारी नियमचा अवलंब करीत आध्यात्मिक डिजिटल महेश नवमी उत्सव साजरा केला.
आपल्यामुळे अन्य नागरिकांना त्रास होऊ नाही, याची संपूर्ण खबरदारी घेत माहेश्वरी समाजाने अन्य समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. शनिवारी शहरात सकाळी खडकेश्वर महादेव मंदिरात समाजाच्या वतीने अभिषेक करण्यात आला. संपूर्ण जगाला कोरोनामुक्त कर, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सी.एस. सोनी, तारा सोनी, संतोष गिल्डा, पूनम गिल्डा, श्रीकांत मुंदडा, स्मिता मुंदडा, मनोज तोतला व सुधा तोतला यांनी अभिषेक केला. याशिवाय ज्योतीनगर प्रभाग व नई दिशाए संघटनेतर्फे पहाटे पाच वाजेपासून दशमेशनगर येथील शिव मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला. यास ‘सत्यम शिवम सुंदरम आणि सत्यही शिव है’ या नुसार आराधना करण्यात आली. या धार्मिक उपक्रमाचा समाजबांधवानी ऑनलाइन अनुभूती घेतली. सायंकाळी समर्थनगर, छावणी प्रभागच्या वतीने आयोजित ‘ भगवान भोले के संग सत्संग’ या भजनाचा कार्यक्रम पार पडला. जालना येथील मनोज गौड महाराज यांनी सादर केलेल्या ऑनलाईन भजनाचा सर्वांनी घरबसल्या आनंद घेतला.
चौकट
देशाच्या उत्कर्षात माहेश्वरी समाजाचे योगदान
देशाच्या उत्कर्षात माहेश्वरी समाजाचे योगदान याविषयावर सायंकाळी ऑनलाईन व्याख्यान झाले. माहेश्वरी मंडळाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी मार्गदर्शन केले. या ऑनलाईन व्याख्यान औरंगाबादच नव्हे तर महाराष्ट्रातील माहेश्वरी समाजबांधवांनी ग्रहण केले. स्वामीजीचे व्याख्यान महेश नवमीचे मुख्य आकर्षण ठरले.
चौकट
२५ दात्यांनी केले रक्तदान
माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने शनिवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. उस्मानपुरा येथील लायन्स ब्लड बँकेत सकाळी १० वाजता शिबिराला सुरुवात झाली. यात २५ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी माहेश्वरी मंडळाचे डॉ. विष्णुदास बजाज, महिला मंडळाच्या अध्यक्षा बबिता करवा, पुष्पा लड्डा, प्रकल्प प्रमुख भारती जाजू व मधू राठी यांनी परिश्रम घेतले.
कॅप्शन
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खडकेश्वर येथील महादेव मंदिरात अभिषेक करून संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे भगवंतांना घालण्यात आले.