वाळूजमहानगर : वाळूज महानगर परिसरात बुधवारी पवित्र रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी मुस्लिम बांधवांनी येथील मस्जिद व ईदगाह मैदानावर विशेष नमाज अदा करुन विश्वशांती आणि चांगला पाऊस पडावा यासाठी दुवा मागितली. यावेळी हजारो मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान महिन्यात मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर रोजा (उपवास) धरतात. विश्वात सर्वत्र शांती नांदावी, बंधुभाव रहावा, यासाठी रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी मस्जिद व ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करुन दुवा मागितली जाते.
वाळूज महानगरातील वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, अंबेलोहळ, कमळापूर, जोगेश्वरी, तीसगाव, शेंदुरवादा येथील ईदगाह मैदानावर व मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवांनी बुधवारी नमाज अदा करण्यासाठी सकाळी गर्दी केली होती.
पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन आलेल्या मुस्लीम बांधवांच्या गर्दीने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. यावेळी मुस्लीम बांधवांनी विशेष नजाम अदा करुन विश्वशांती, बंधुभाव व यंदा चांगला पाऊस पडावा यासाठी दुवा मागितली. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेवून पवित्र रमजान ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लीम बांधवाबरोबरच हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शिख धर्मीय समाज बांधवही दिवसभर मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देवून शिरखुर्म्यासह विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.