तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) शिवारातील नाल्यावर पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, विहिरींचा पाणीसाठा वाढावा यासाठी मे महिन्यात भूमिगत सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता़ पाटबंधारे विभागाच्या वतीने हा बंधारा बांधल्यानंतर १५ दिवसात पाऊस झाला. मात्र, काम निकृष्ठ झाल्याने पाणीसाठा झाल्यानंतर बंधाऱ्याला १५ दिवसातच तडे गेले आहेत. ठेकेदाराने तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी बंधाऱ्यातील गाळ काढला नसल्याने पाणीसाठा होऊ शकला नाही.वडगाव (काटी) परिसरातील शेतकऱ्यांना नेहमीच अवर्षणाची समस्या भेडसावते़ दुष्काळावर मात करण्यासाठी शिवारात पडणारे पावसाचे पाणी शिवारात अडवून ते जिरविले पाहिजे, अशी मागणी होवू लागली़ यातूनच गावच्या शिवारातील नाल्यावर मे महिन्यात पाटबंधारे विभागाच्या वतीने ठेकेदारामार्फत २० लाख रुपये खर्चाच्या भूमिगत सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले. काम सुरू असताना त्याचा दर्जा कुणीही पाहिला नाही. मृगाचा पाऊस पडला अन् पंधरा दिवसातच बंधाऱ्याला तडे गेले. ठेकेदाराने त्यावर मलमपट्टी केली. मात्र, त्याचा उपयोग होताना दिसत नाही़ निकृष्ट कामाचा नमुना समोर आला. मात्र, बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यानंतर पाणीसाठा होणाऱ्या नाल्यातील गाळ काढला नाही. उलट खोदाई कामात निघालेली माती तशीच सिमेंट भिंतीजवळ पसरल्याने गाळाने भरलेल्या बंधाऱ्यात काय पाणीसाठा होणार ? अखेर नाल्यातून पाणी बंधाऱ्याद्वारे वाया गेले आणि पाणी जमिनीत मुरविण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न अधुरे राहिले़ या कामाची चौकशीही पाटबंधारे विभागाकडून केली जात नाही़ बंधाऱ्याचे काम सुरू असताना एकही अधिकारी फिरकला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत़
सिमेंट बंधाऱ्याला पंधरा दिवसात तडे !
By admin | Published: August 19, 2016 12:40 AM