छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. शहराचे तापमान जवळपास ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. एवढ्या तापमानात सिमेंट रस्ते करणे अशक्यप्राय होत आहे. त्यामुळे महापालिकेने १०० कोटींच्या पॅकेजमधील रस्त्यांची कामे तूर्त थांबविली आहेत. रात्रीसुद्धा रस्त्याची कामे केल्यास दुसऱ्या दिवशीपासून क्युरिंगसाठी जास्त पाणी लागत आहे. रस्त्यांची कामे पावसाळ्यात सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
शहरातील सर्वच प्रमुख रस्ते सिमेंट पद्धतीचे व्हावेत, यासाठी मनपा प्रशासनाने काही वर्षांपूर्वी धोरण आखले. पहिल्या टप्प्यात जवळपास ३०० कोटींची कामे करण्यात आली. त्यानंतर स्मार्ट सिटी आणि मनपा निधीतून ३१७ कोटी खर्च करून १११ रस्ते करण्याचा निर्णय झाला. मागील वर्षी मनपा निधीतून १०० कोटींच्या चार निविदा काढून काम सुरू केले. ही कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. उन्हाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. एकूण ६१ रस्त्यांची कामे हाती घेतली. त्यातील फक्त ३० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मे महिना सुरू होताच सूर्य आग ओकू लागला. एवढ्या तापमानात सिमेंट रस्ते तयार करताना बराच त्रास सहन करावा लागतोय. सिमेंट प्लांटवरून मिक्स केलेले साहित्य आणल्यानंतर ते तापमानामुळे लवकरच सेट होत आहे. अत्यंत कमी वेळेत सिमेंटचे साहित्य पसरविणे अशक्यप्राय होत आहे. त्यामुळे महिनाभर या कामांना ब्रेक लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ४० अंशांवर तापमान असेल तर सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत.
अतिक्रमणे, शिफ्टिंगचा प्रश्नमनपाने ६१ रस्त्यांची निवड केली. या रस्त्यांवरील अतिक्रमणे, जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन मनपाने शिफ्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे काही रस्त्यांची काम सुरू झालेली नाहीत. उन्हाळ्यात ही कामे झाली तर पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू करता येतील. मनपाचीच यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार कंत्राटदारांनी केली आहे.