औरंगाबाद : गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाला. औरंगाबादेत २३ मार्च २०२० पासून १८ एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या काळात १७९ ख्रिस्ती नागरिकांचे वृद्धापकाळ, विविध आजार, अपघात आणि कोरोनामुळे निधन झाले. १८ व्या शतकापासून पडेगावच्या दफनभूमीत दफनविधी केले जातात. सध्या या दफनभूमीत जागाच नसल्यामुळे जुन्या दोन कबरींच्या मध्ये किंवा ३ वर्षांपूर्वी दफन केलेल्या पूर्वजांच्या कबरेत आता विद्यमान मृतदेहाचे दफन केले जाते. अशी ‘फॅमिली ग्रेव्ह’ची योजना सध्या राबविणे अपरिहार्य झाले आहे.
गेल्या वर्षभरात निवर्तलेल्यांपैकी पडेगाव येथील ख्रिश्चन दफनभूमीत १५७ मृतदेहांचा दफनविधी करण्यात आला. मार्च ते डिसेंबर २०२० दरम्यान ९८, तर जानेवारी ते एप्रिल २०२१ दरम्यान ५९ मृतदेहांचा दफनविधी येथे करण्यात आला. सिडकोतील दफनभूमीत २०२० साली १० आणि २०२१ च्या ४ महिन्यांत १२, अशा २२ मृतदेहांचा दफनविधी करण्यात आला.
सध्या पडेगाव, सिडको, मुकुंदवाडी आणि क्रांतीचौक अशा ४ ठिकाणी ख्रिश्चन दफनभूमी आहेत. विद्यापीठ परिसरातील बॉटनिकल गार्डननजीक आणि सध्याच्या महापालिका कार्यालय आणि आयटीआयदरम्यानच्या जुन्या २ दफनभूमींचा ताबा इतरांनी घेतल्यामुळे या दफनभूमी सध्या उपलब्ध नाहीत.
समाजाने केलेल्या खानेसुमारीनुसार सध्या औरंगाबाद शहर आणि आसपासच्या परिसरात सुमारे ४० हजार ख्रिस्ती लोक असून, ७३ चर्च आहेत. दफनभूमी समिती (सिमेट्री कमिटी) कडील नोंदीनुसार पडेगाव येथील दफनभूमीत १८२० साली पहिला दफनविधी झाला होता. इंग्रज अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांचे दफनविधी येथे केले जात असत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात औरंगाबादमध्ये भारतीय ख्रिस्ती लोकांचे वास्तव्य झाल्यापासून आजतागायत पडेगावच्या दफनभूमीत दफनविधी केले जात आहेत. मात्र, या दफनभूमीत आता जागाच शिल्लक राहिली नाही. ही दफनभूमी सैन्यदलालगत असल्यामुळे येथील ''अ'' वर्गाची वाढीव जागा दफनभूमीसाठी देता येत नसल्याचे तत्कालीन ब्रिगेडियर यांनी ख्रिस्ती समाजाच्या निवेदनाच्या उत्तरार्थ सांगितले होते.
येथील लोकांच्या पूर्वजांचे दफनविधी पडेगावच्या दफनभूमीत झालेले असल्यामुळे शहरात कुठेही वास्तव्यास असलेले ख्रिस्ती लोक आताही पडेगावच्याच दफनभूमीत दफनविधीसाठी आग्रह धरतात.
-----जो़ड