औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या भागांतून गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना औरंगाबादेत रेफर केले जात आहे. परिणामी, अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांच्या मृत्युसंख्येने शतक पार केले. औरंगाबादेत उपचार सुरू असताना आतापर्यंत जालना, बीड, नांदेडसह विविध जिल्ह्यांतील ११७ रुग्णांचा मृत्यू झाला.
औरंगाबादेत उपचार सुरू असताना गेल्या ८ महिन्यांत आतापर्यंत तब्बल १,२७५ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु हे सर्व रुग्ण फक्त औरंगाबाद जिल्ह्यातील नाहीत. इतर जिल्ह्यांतून उपचारासाठी औरंगाबादेत दाखल झालेल्या रुग्णांचाही यात समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. औरंगाबादेत उपचारासाठी इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेक जिल्ह्यांतून गंभीर अवस्थेत रुग्णांना औरंगाबादेत पाठविले जाते. उपचारासाठी डाॅक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
घाटीत ९०० मृत्यू
घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येने रविवारी ९०० चा आकडा गाठला. यात इतर जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश आहे. घाटीत जालना, बीड, नांदेड, जळगाव, बुलडाणा यासह अन्य जिल्ह्यांतून कोरोनाचे रुग्ण दाखल होतात. अन्य जिल्ह्यांतील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारीही घाटीच्या खांद्यावर असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जिल्ह्याचा मृत्यूदर २.६४ टक्के
औरंगाबाद जिल्ह्यातील १,१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर हा २.६४ टक्के आहे. गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.