छत्रपती संभाजीनगर : बहुप्रतिक्षित जालना-जळगाव या १७४ किमी लांबी असलेल्या नवीन लोहमार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी ग्रीन सिग्नल दिला. एकूण ७ हजार १०५ कोटीच्या खर्चालाही मंजुरी मिळाली आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब केल्याने या भागातील नागरिकांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल पडले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. राज्य सरकारने आपला ५० टक्के हिस्सा यापूर्वीच मंजूर केला आहे. रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री असताना, त्यांनीच या लोहमार्गाचा प्रस्ताव सादर केला होता. रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावदेखील मंजूर करून घेत हवाई सर्वेक्षणासाठी ४ कोटी ३५ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. अजिंठा लेणीमुळे हा मार्ग विदर्भासह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठा सोईस्कर ठरणार आहे. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र राजूरचे गणपती मंदिरदेखील याच लोहमार्गावर आल्याने मराठवाडा-खान्देशाचे संबंध अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे. थेट उत्तर भारताशी जोडणाऱ्या या रेल्वे मार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भूसंपादनासह पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
असा आहे हा लोहमार्ग..!जालन्यातून पीरपिंपळगाव, बावणे पांगरी, श्रीक्षेत्र राजूर, भोकरदन, सिल्लोडमार्गे गोळेगाव, अजिंठा, फर्दापूर, जळगाव, असा ७० टक्के मार्ग जालना जिल्ह्यातून जाणार आहे. याचा फायदा पुढे सूरत, गुजरात, राजस्थानच्या गाड्यांना आंध्र प्रदेश, दक्षिण भारताकडे जाण्यासाठी जवळचा छोटा मार्ग म्हणून होणार आहे.
पर्यटन, व्यापारासाठी फायदाजगभरातून पर्यटक अजिंठ्याला येत असतात. या नवीन लोहमार्गामुळे विदर्भासह मराठवाड्यातील प्रवाशांसाठी हा अत्यंत सोपा, सुलभ मार्ग होणार आहे. अजिंठा लेणीसह श्रीक्षेत्र राजूरचे मंदिर रेल्वेच्या नकाशावर आले पाहिजे, यासाठी आपण आग्रही होतो. जालना जिल्हा स्टील, बियाणे आणि मोसंबीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता ही उत्पादने रेल्वेने गुजरात, मध्य प्रदेशच्या बाजारपेठेत थेट नेता येईल.- रावसाहेब दानवे, माजी रेल्वे राज्यमंत्री