औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी राज्य सरकारने केंद्र शासनाकडे मागणी केलेला २ हजार २५१ कोटींचा निधी जूनअखेरपर्यंत राज्याला मिळणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने रबीच्या मदतीसह जनावरांच्या चारा छावण्या आणि पाणीटंचाई निवारण्यासाठी केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींची मागणी केली. सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती, जनावरांच्या चारा छावण्या, पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावात टँकरने होणारा पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी केंद्र शासनाच्या पथकाने तीन दिवसांत केली. दुष्काळ निवारणासाठी व रबी हंगामाकरिता केंद्र शासनाकडे २ हजार २५१ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी करून अतिरिक्त माहिती घेतली आहे. खरीप हंगामात मराठवाड्यातील ८ हजार ५२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आल्यामुळे केंद्राने मदत दिली आहे. रबी हंगाम एप्रिल आणि मेअखेरला संपत असल्यामुळे केंद्रीय पथक मेअखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात आले आहे. पथकाकडून केंद्राकडे अहवाल सादर केला जाणार असल्यामुळे जूनअखेरपर्यंत राज्याला २ हजार २५१ कोटींचा निधी मिळणार असल्याचे गोविंदराज यांनी सांगितले.
जूनअखेरपर्यंत केंद्राकडून मदत
By admin | Published: June 03, 2016 11:31 PM