करमाड : औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी मक्याला शासकीय दर मिळावा म्हणून मका विक्रीसाठी ऑनलाईन नंबर बुक केला. खरेदीची तारीख मिळाली. शेतकरी मका गेऊन गेले असता करमाड येथील मका खरेदी बंद झाली म्हणून शेतकऱ्यांना मक्यासह घरी परतावे लागत आहे.
शासकीय मक्याचा दर १८५० रुपये, तर खासगी ११०० ते १३०० रुपये भाव मिळतो. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी शासकीय मका खरेदी केंद्रावर मका विक्री करण्यासाठी आग्रही असतात. संकेतस्थळावर मका विक्रीची नोंद केली. १५ व १६ डिसेंबर रोजी आपला मका विक्रीसाठी घेऊन यावे, असे संदेश आल्याने मका घेऊन गेले ,परंतु निराशा पदरी पडली.
औरंगाबाद तालुक्यातील खरिपाची मका उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्याने मका सांभाळला. शिवाय इतर बाजारपेठेत मका विक्रीसाठी नेला असता अकराशे ते तेराशे रुपये दरम्यान भाव मिळत आहे. मका पिकाला १८५० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला असताना कुठेही हा हमी भाव मिळत नाही. ऑनलाईन मका पिकाची नोंदणी करावी लागते. त्या सोबत आधार कार्ड, सातबारा, पीक पेरापत्र, बँक पासबुक, आदी कागदपत्रे जोडून नंबर आल्यास आदल्या दिवशी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेश अथवा कॉल करून मका खरेदीच्या सूचना मिळते. मका घेऊन गेल्यावर मोजमाप होऊन तब्बल दोन ते तीन आठवड्यांनंतर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. किचकट प्रक्रिया पार पाडूनही लाडसावंगी, करमाड येथील मका खरेदी केंद्रावर गेले असता केंद्रच बंद असल्याने मका परत घरी घेऊन यावे लागले, तर काहींनी डबल भाडे मोजण्यापेक्षा जालना बाजारपेठेत मका विक्रीसाठी नेला असता बाराशे रुपये दराने मका विकावा लागला.
नियमानुसार बंद..
औरंगाबाद तालुक्यात करमाड शासकीय मका खरेदी केंद्रावर १४२ शेतकऱ्याने मका विक्रीसाठी संकेत स्थळावर नोंद झाली होती. त्यातील केवळ २१ शेतकऱ्यांची आम्ही मका खरेदी केली, परंतु १६ डिसेंबरपासून मका खरेदी करण्यात येऊ नये, असा निरोप वेळेवर आल्यामुळे आम्ही केंद्र बंद केले. - लक्ष्मण पोफळे, मका खरेदी व्यवस्थापक करमाड केंद्र
फ़ोटो - करमाड येथील बंद असलेले शासकीय मका खरेदी केंद्र.