---
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या (एसटीआरआयव्हीई) योजनेत मराठवाड्यातून औरंगाबाद आणि घनसावंगी येथील शासकीय आयटीआय या फेज दोनमध्ये पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या संस्थांना दोन कोटींचा निधी कोर्स, ट्रेड, अभ्यासक्रम श्रेणीवर्धीत करण्यासाठी मिळेल, अशी माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य अभिजित अलटे यांनी दिली.
१९६० मध्ये शासकीय आयटीआय सुरू झाले. तेव्हापासून एकच अभ्यासक्रम होता. तो आता बदलला. हळूहळू २९ ट्रेडचे ७८ युनिटमधून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करून त्यांना रोजगारक्षम बनविल्या जात आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार लागणारी यंत्रसामग्री साहित्याच्या खरेदीसाठी एसटीआरआयव्हीई योजनेचा निधी उपयोगी पडेल. त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. मुलांची-मुलींची आयटीआयची क्षमता वाढवून निकालाचे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत न्यावे लागणार आहे. प्रवेश क्षमता वाढविण्यावर भर द्यावा लागेल. त्यानुसार आता १२ ट्रेड अपग्रेड केले जातील, तर आठ युनिट वाढविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून ३०० तासांचे शार्टटर्म कोर्सेस, कारखान्यात नोकरी दरम्यान शिक्षण, वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी आवश्यक अप्रेंटीसची सुविधा कंपन्यांमध्ये निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय आयटीआयच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ कोरोनाकाळात रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आले, तर २२ कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन ऑडिट करून त्रुटी निदर्शनास आणून देण्याचे कामही संस्थेने केले, असे प्राचार्य अलटे म्हणाले.