औरंगाबाद : कचर्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ८० कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या ३० एकर जागेवर बायोमिथेन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा आज महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या प्रकल्पाचा कोणालाच त्रास नाही. कचर्यावर प्रक्रिया करणारा हा सर्वोत्तम प्रकल्प ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शहरातील नऊ झोनमध्ये बायोगॅस निर्मितीचे प्रत्येकी तीन प्रकल्प उभारण्यात येतील. शहरात जागेची कमतरता नाही. नियोजनाचा अभाव आहे. सूक्ष्म नियोजन सुरू झाले असून, नागरिकांना काही दिवसांमध्ये रिझल्टही पाहायला मिळतील. कचर्यावर झोननिहाय प्रक्रिया करण्याशिवाय एक मोठा प्रकल्प चिकलठाण्यात उभारण्यात येईल. यासाठी लवकरच इंदौर,भोपाळ येथील प्रकल्पांची पाहणी करण्यात येणार आहे. सध्या शहरातील विविध रस्त्यांवर ७०० ते १५०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. हे आकडे अंदाजित आहेत. युद्धपातळीवर चार ते पाच ठिकाणी सुका कचरा वेगळा करणे, कचरा वेचकांना तो नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
ज्या कचर्याला कोणीच उचलून नेत नाही, असा सुका कचरा मोठ्या सिमेंट कंपन्यांना पाठवून देण्यात येत आहे. आतापर्यंत चार ट्रकद्वारे १२ टन कचरा बाहेर पाठविण्यात आला आहे. वाळूज येथील काही कंपन्या हा कचरा नेण्यास इच्छुक आहेत. पाच हजार कचरा वेचकांची नियुक्ती लवकरच होईल. त्यांना सोयीसुविधाही मनपा देणार आहे. जिथे सध्या कचरा पडून आहे, त्यावर केमिकल फवारणी सुरू आहे. वॉर्डनिहाय कचर्याचे वर्गीकरण अनेक ठिकाणी होत नाही. यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. मी स्वत: आतापर्यंत ज्या वसाहतींमध्ये गेलो तेथील नागरिकांचा विश्वास संपादन करूनच उठलो. ओल्या कचर्यापासून खतनिर्मितीचा पुंडलिकनगर येथील प्रकल्प चांगला आहे. हीच पद्धत शहरातही राबविण्यात येईल.