औरंगाबाद : शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा म्हणून शेतमाल (कृषी उत्पादन) कमीत कमी वेळेत देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचावे याकरिता चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (Aurangabad International Airport ) कृषी उडान-२.० ( Krushi Uddan Scheme ) योजनेत समावेश करण्याबाबत सकारात्मक असल्याचे केंद्रिय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia ) यांनी एका पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य तथा खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jalil ) यांनी मागणी केली होती. जर समावेश झाला तर या निर्णयाचा मोठा फायदा औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे. देशातील इतर बाजारपेठेत येथील शेतमाल कमीतकमी वेळेत पोहचविण्याची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना मालाचा योग्य मोबदला मिळत नाही. यात मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. यासाठी शेतमालाची कमीतकमी वेळेत हवाई मार्गाने वाहतूक करणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिनांक ०५ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या पत्रातून केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कृषी उडान योजनेत औरंगाबादसह मराठवाड्याचा समावेश करण्याच्या व्यवहार्यतेचा भविष्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय सकारात्मक विचार करणार असल्याचे खा. जलील यांना कळविले आहे. चिकलठाणा विमानतळाचा या योजनते समावेश झाला तर औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतीमाल देशाच्या विविध बाजारपेठेत कमी वेळेत पोहचेल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळण्यास मदत होईल.
काय आहे कृषी उडान योजना २.०कृषी उत्पादन योजना १.० ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या वाहतुकीत मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अनेक मूल्यांची प्राप्ती सुधारू शकेल. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली, कृषी उडान योजना २.० मध्ये डोंगराळ भाग, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत मालवाहू उत्पादनांच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेचा उद्देश सर्व कृषी उत्पादनांसाठी, विशेषत: देशाच्या ईशान्य, डोंगराळ आणि आदिवासी भागातून उद्भवलेल्या सवलतीच्या, विनाव्यत्यय आणि वेळेनुसार हवाई वाहतूक सुनिश्चित करणे हा आहे.