औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्यासाठी सोमवारी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले. मंगळवारी पथकातील १२ सदस्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. शहरात दररोज एक हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे पथकातील सदस्यांना निदर्शनास आले. त्यामुळे पथकातील सदस्य माघारी परतण्याच्या तयारीत आहेत.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरात केंद्रीय पथक सोमवारी दाखल झाले. पथकात बारा सदस्य आहेत. सोमवारी सायंकाळी या बारा सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीला पालिकेचे स्वच्छता निरीक्षकदेखील उपस्थित होते. स्वच्छता निरीक्षक व केंद्रीय पथकातील सदस्य यांची सांगड या बैठकीत घालून देण्यात आली. ११५ वॉर्ड बारा सदस्यांनी वाटून घेतले. एका सदस्याच्या वाट्याला नऊ ते दहा वॉर्ड आले.
मंगळवारी सकाळपासून स्वच्छ सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय पथकातील सदस्यांनी घेतला. ‘कचरा मुक्त शहर’ ही यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाची मध्यवर्ती कल्पना आहे. या मध्यवर्ती कल्पनेप्रमाणे त्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले. कोणत्या सदस्याने कोणत्या वॉर्डात सर्वेक्षणासाठी जायचे हे त्यांच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा स्वच्छता निरीक्षकांना पथकातील सदस्य कुठे जाणार आहेत याची पूर्वकल्पना नव्हती.
पथकातील सदस्यांनी दुपारपर्यंत सर्वेक्षणाचे काम केले. पथकातील सदस्य विविध वॉर्डांमध्ये गेले. नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना शहरातील कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाची कल्पना आली. शहरात दररोज एक हजार रुग्ण आढळून येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुपारनंतर त्यांनी काम बंद केले व वरिष्ठांशी संपर्क साधून काम थांबविण्याची विनंती केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुन्हा येऊन सर्वेक्षण करू, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना सर्वेक्षणाचे काम थांबविण्याबद्दल कोणतेही आदेश प्राप्त झाले नव्हते.