औरंगाबाद : मराठवाड्यातील खरीप हंगामाच्या पाहणी अनुषंगाने दहा उच्च पदस्थ अधिकारी सदस्यांचे केंद्रीय पथक ५ ते ७ डिसेंबरदरम्यान दौऱ्यावर येत असून, तीन पथके राज्याचा आढावा घेण्यासाठी गठित करण्यात आली आहेत. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी) अंतर्गत येणाऱ्या पथकाच्या प्रमुख केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छवी झा या असतील. खरीप हंगाम २०१८ मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पिकांची उत्पादकता घटली आहे. त्या अनुषंगाने शासनाने केंद्र शासनाकडे मदतीची मागणी केली आहे.
राज्य शासनाच्या मागणीचा ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी पथक औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, बुलडाणा जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेईल. ५ रोजी सकाळी ९ वाजेपासून तिन्ही पथके येथून रवाना होतील. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी मुंबई येथील बैठकीत राज्यातील खरीप पाहणीचा अहवाल देतील. त्या अहवालानंतर केंद्र शासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत निर्णय घेतील. पथकात नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी विमानाने औरंगाबादेत येतील. ५ रोजी सकाळी ९ ते १०.३० दरम्यान विभागीय प्रशासन आयएमसीटीला येथील दुष्काळी परिस्थितीबाबत अवगत करतील. त्यानंतर तिन्ही पथके नेमून दिलेल्या जिल्ह्यांकडे प्रस्थान करतील.
पथक क्र.१या पथकात सहसचिव छवी झा, भोपाळ येथील संचालक ए.के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी औरंगाबाद आणि जालना येथे पाहणी करील. त्यानंतर जालना येथे मुक्कामी थांबेल. ६ रोजी परभणी आणि बीड जिल्ह्यांतील पाहणी करून औरंगाबादेत मुक्कामी असेल. ७ रोजी सकाळी विमानाने मुंबईतील बैठकीला पथकातील सदस्य जातील.
पथक क्र. २या पथकात एफसीडीचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, मुंबईचे एफसीआयचे डीजीएम एम.जी. टेंभुर्णे, विजय ठाकरे यांचा समावेश असेल. हे पथक ५ रोजी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांत जाईल. सोलापूर येथे मुक्कामी थांबेल. त्यानंतर ६ रोजी सांगली, सातारा आणि पुण्यातील खरीप क्षेत्राची पाहणी करून पुण्यात मुक्कामी थांबतील. ७ रोजी मुंबईतील बैठकीला हे पथक जाईल.
पथक क्र. ३या पथकात सहसल्लागार महेश चौधरी आणि एस.सी. शर्मा यांचा समावेश असेल. ५ रोजी हे पथक बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यांत जाईल. पथकाचा जळगावात मुक्काम होईल. त्यानंतर ६ रोजी धुळे व नाशिक जिल्ह्यांतील परिस्थितीचा पथक आढावा घेऊन नाशिकला मुक्कामी थांबेल. ७ रोजी पथक मुंबईतील बैठकीला हजेरी लावील.