औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छता सर्वेक्षण २०२१ उपक्रमात केंद्र शासनाचे पथक पुढील आठवड्यात शहरात दाखल होणार आहे. तत्पूर्वी २५ फेब्रुवारीपासून मनपा प्रशासन ११५ वॉर्डमध्ये सखोल अंतर्गत मूल्यांकन मोहीम राबविणार आहे.
मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहर भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशातील १० स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळविण्यासाठी काम करीत आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी, मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथक सर्वेक्षण करण्यासाठी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.
घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले की, तज्ज्ञांच्या भेटीपूर्वी मनपा नागरिकांकडून कचरा वेगळा करणे, घंटागाड्यांद्वारे संकलन यांचा आढावा घेण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मधील सहभागाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणार नाही, तर स्वच्छता मोहिमेसाठी शहराची उत्तम तयारीही या माध्यमातून होईल, असे भोंबे यांनी सांगितले. अंतर्गत सर्वेक्षणात मनपाचे स्वच्छता निरीक्षक, स्मार्ट सिटीअंतर्गत काम करणारे इंटर्नस् आणि सीआरटीचे सदस्य शहरातील ११५ वॉर्डांपैकी प्रत्येक वॉर्डात सर्वेक्षण करतील. स्वच्छ सर्वेक्षण संस्थेच्या निकषानुसार मनपातील स्वच्छता कामगारांची कामगिरी, तेथील रहिवाशांच्या सर्व्हेचे प्रमाण, पडताळणी हे तेथील स्त्रोत व कचरा वेगळा करण्याच्यादृष्टीने करणार आहेत.