लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नव्याने स्थापन झालेल्या योगशास्त्र विभागाच्या उद्घाटनासाठी स्वतंत्र कार्यभार असलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक शुक्रवारी (दि.१७) दुपारी तीन वाजता येत आहेत. योगशास्त्र विभाग हा राज्यातील विद्यापीठांमधील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षापासून नव्याने योगशास्त्र विषयाचा विभाग सुुरूकेला आहे. या विभागात योग थेरपी, मॉडर्न योगा, स्ट्रेस मॅनेजमेंट याशिवाय खेळाडूंसाठी योगशिबीर, प्राध्यापकांसाठी योगा, बीपी, डायबेटिस, स्पाँडिलायसीससह इतर विषयांचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे.या विभागाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक विद्यापीठात शुक्रवारी येत आहेत. हा उद्घाटनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या नाट्यगृहात दुपारी तीन वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए.चोपडे राहणार आहेत, तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहेत. योगशास्त्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष संकल्पनेतून साकारलेला अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्वच विद्यापीठांना दिलेले आहेत.या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ असल्याचेही डॉ. चोपडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला योगशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. वैशाली बोदेले, डॉ. अशोक बंडगर, प्रा. गजानन दांडगे आदी उपस्थित होते.
केंद्रीय आयुषमंत्री आज विद्यापीठात; योगशास्त्र विभागाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:42 PM