औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून राबवण्यात येत असलेल्या ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमाचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी तालुकानिहाय आढावा घेतला, तसेच २५ जूनपर्यंत या उपक्रमातून शाळांचे रुपडे पालटण्यासाठीच्या कामाला गती देण्याचे सूचना करताना त्यासाठी आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली.
तालुकानिहाय घेतल्या बैठकीत ९ गटशिक्षणाधिकारी, २४ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील शाळांच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. यात शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शिक्षकांनी कोरोना काळातही उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल डाॅ. गोंदावले यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले, तसेच ‘सुंदर माझे कार्यालय’ संकल्पना राज्य स्तरावर स्वीकारल्या गेली. त्याच धर्तीवर हा उपक्रमही राज्यात आदर्श ठरावा, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त केली. सुंदर माझे कार्यालय योजनेला ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यापूर्वी २५ जूनपर्यंत शाळांतील आकर्षक सजावट, रचना करण्याचे उद्दिष्ट क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले.
जि. प. अध्यक्ष मीना शेळके व शिक्षण सभापती अविनाश गलांडे हे या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करीत आहेत. आवश्यकता भासल्यास जिल्हा परिषद उपकरामधून आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे, असेही ते म्हणाले. बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.