लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी परिसरात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तीन हजारांवर गेली; परंतु तीन दिवस उलटूनही घटनेची माहिती देण्याकडे दुर्लक्ष केले. वृत्तपत्रांमधून माहिती मिळते. मात्र, छावणी परिषद साधी माहितीही कळवत नसल्याचे म्हणत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (दि.१४) छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांना चांगलेच झापले.नवल किशोर राम हे छावणी सामान्य रुग्णालयात मंगळवारी दुपारी २.३० वाजता दाखल झाले. यावेळी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी.एम. गायकवाड उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी गॅस्ट्रोच्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर उपस्थित नसल्याचे लक्षात येताच नवल किशोर राम यांनी त्यांना बोलावून घेतले. छावणी टोलनाका परिसरात असलेले विजयकुमार नायर धावतपळत रुग्णालयात दाखल झाले. यावेळी जिल्हाधिका-यांनी नायर यांची चांगलीच कानउघाडणी केली. तीन हजार लोकांना गॅस्ट्रो होणे ही मोठी आपत्ती आहे. जिल्ह्यात काही घडले तर ती माझी जबाबदारी आहे. तरीही किती रुग्ण आहेत, काही मदत हवी आहे का, यासंदर्भात काहीही कळविण्यात आले नाही. वृत्तपत्रांमधून माहिती मिळाली, असे म्हणत जिल्हाधिका-यांनी त्यांना सुनावले.रुग्णांची विचारपूस केल्यानंतर नवल किशोर राम यांनी छावणी टोलनाका येथून जाणा-या जलवाहिनीच्या परिस्थितीची पाहणी केली. मनपा आयुक्त, घाटी रुग्णालयास माहिती दिली; परंतु जिल्हाधिका-यांना माहिती देण्याचे राहून गेल्याची कबुली विजयकुमार नायर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुणे येथील छावणी परिषदेच्या कार्यक्रमासाठी पदाधिकारी रवाना झाले होते. घटनेची माहिती मिळताच काही जण परतले; परंतु काहींनी परतण्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हाधिका-यांकडून सीईओंची खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:39 AM