राजेश खराडे , बीडसरासरीएवढे पर्जन्यमान न होताही खरिपातील पिके अद्यापर्यंत जोमात होती. रिमझिम पावसामुळे का होईना पिके बहरात असताना गेल्या दहा दिवसांपासून पावसाची उघडीप व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील ओल उडत आहे. परिणामी खरिपातील पिके सुकू लागली आहेत.मराठवाड्यात सर्वांत कमी पाऊस बीड जिल्ह्यात होऊनदेखील सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. पीक लागवडीपासून वेळोवेळी पाऊस झाल्याने दोन महिन्यांतच दोन महिन्यात पिके बहरात आली होती. या उघडिपीच्या काळात शेतकऱ्यांनी मशागत आणि खत फवारणीची कामे करून घेतली. १० दिवसांचा कालावधी होऊन गेला तरीही पावसाचे पुनरागमन झालेले नाही. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी खोल मशागत केली आहे. सध्याचे ऊन आणि वारा यामुळे शेतजमीन कोरडीठाक पडू लागली आहे. हलक्या मशागतीची आवश्यकता असताना शेतकऱ्यांनी खोल मशागत केल्याचा परिणाम सद्य:स्थितीला जाणवू लागला आहे. त्यातच दिवस उजाडताच कडक ऊन पडत असून, दिवसभर उभे वारे सुटत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. अजून आठ दिवस तरी असे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्राने वर्तविला आहे. त्यामुळे पिकांची अवस्था काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीक वाढीकरिता पावसाची उघडीप फलदायी असली तरी सद्य:स्थितीला पावसाची नितांत गरज आहे. यातच शेतकऱ्यांनी पिकांना पाणी दिल्यास ओल उडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पिके कोमेजली !
By admin | Published: August 19, 2016 12:34 AM