- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : सिझेरियन प्रसूती हा वादग्रस्त, संवेदनशील असा विषय आहे. मात्र, अलीकडे ‘प्रकृती खूप नाजूक आहे’, ‘त्रास होईल, कळा सहन होणार नाहीत’, यांसह ‘आमचे बाळ ठराविक दिवशी, अमुक वेळेतच जन्मावे’ अशा अनेक कारणांनी डॉक्टरांकडे नैसर्गिक प्रसूतीऐवजी सिझेरियनची मागणी करण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, गरोदरमातांचे समुपदेशन करण्याची वेळ येत आहे. एकट्या घाटी रुग्णालयात समुपदेशनानंतर ६० टक्के महिला नैसर्गिक प्रसूतीसाठी तयार होतात, उर्वरित महिलांची गुंतागुंत, अतिजोखमेसह अनेक कारणांनी सिझेरियन करावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
गरोदरपणाचे पूर्ण महिने भरल्यानंतर होणाऱ्या ९० टक्के प्रसूती या नैसर्गिक होतात. काही वेळा गरोदरपणात निर्माण झालेली गुंतागुंत आणि त्यातून बाळाला, मातेच्या जीवितास धोका असेल, तर सिझेरियन प्रसूतीचा निर्णय घेतला जातो. एकट्या घाटीत गेल्या वर्षभरात म्हणजे २०१९ मध्ये १९ हजार ३२२ प्रसूती झाल्या. यात ७३ टक्के प्रसूती म्हणजे १४ हजार २०२ प्रसूती या नैसर्गिक झाल्या, तर २७ टक्के म्हणजे ५ हजार १२० सिझेरियन झाल्या.गेल्या २० वर्षांत सिझेरियन प्रसूतीत २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे प्रसूतितज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी अनेक कारणे आहेत. एकीकडे वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक सिझेरियन प्रसूतीने महिला आणि शिशूचा जीव वाचविणे शक्य झाले आहे.
दुसरीकडे गरज नसतानाही केल्या जाणाऱ्या सिझेरियन प्रसूतीविषयी चिंता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी गेल्यास सिझेरियन प्रसूतीच होणार, असा अनुभव नागरिकांकडून चर्चिला जातो. गरोदरपणात ‘डॉक्टर, माझी नैसर्गिक प्रसूती होईल ना?’ असे प्रश्न विचारले जातात, तर दुसरीकडे ‘डॉक्टर, सिझेरियन प्रसूती करा’ असा संवाद अलीकडे होत आहे. गरोदरमातेसह नातेवाईकांकडून हा संवाद असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशावेळी गरोदरमातेचे समुपदेशन करून तिला नैसर्गिक प्रसूतीसाठी तयार केले जाते. नैसर्गिक प्रसूती शक्य नसेल, तरच सिझेरियन प्रसूती केली जात असल्याचे घाटीतील तज्ज्ञ म्हणाले.
परिस्थितीनुसार निर्णयगेल्या २० वर्षांत सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले आहे. त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहे. गरोदरमातेने सिझेरियन प्रसूतीची मागणी केली आणि डॉक्टरांनी सिझेरियन केले, असे होत नाही. नैसर्गिक प्रसूतीलाच प्राधान्य दिले पाहिजे आणि दिले जाते. परिस्थितीनुसार सिझेरियनचा निर्णय घेतला जातो. भूलतज्ज्ञांच्या मदतीने आज वेदनारहित प्रसूती शक्य झालेली आहे. - डॉ. जयश्री मोरे, अध्यक्ष, औरंगाबाद प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना
मागणीवरून सिझेरियन करणे चुकीचेकाही जणांकडून सिझेरियनची मागणी केली जाते. याला ‘सिझेरियन आॅन डिमांड’ असे म्हटले जाते. यासाठी त्यांचे अनेक गैरसमज असतात. कळा म्हणजे खूप असह्य वेदना वाटतात. मात्र, अशा ६० टक्के महिला समुपदेशनानंतर नैसर्गिक प्रसूतीला तयार होतात. अतिजोखीम, काही धोका असेल तरच सिझेरियनचा निर्णय घेतला जातो. गरोदरमातांनी मागणी केली म्हणून सिझेरियन करणे हे चुकीचे आहे.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, घाटी