---
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. एकीकडे दहावीचे मूल्यमापन कसे होईल हे स्पष्ट नसताना शिक्षण विभाग एक स्वतंत्र सीईटी घेण्याच्या विचारात आहे. ही परीक्षा ऑफलाइन होईल की ऑनलाइन हा प्रश्न अनुत्तरित असून, अंतर्गत मूल्यमापनासाठी नेमके काय निकष अवलंबिले जाणार, याचेही कोडे अद्याप उलगडले गेले नाही.
कोरोनामुळे अवघे काही दिवस प्रत्यक्ष वर्ग भरले. तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तेही बंद पडले. गेल्या वर्षभर ऑनलाइन शिकलेल्या विद्यार्थ्यांचे आकलन काय झाले हा सध्या संशोधनाचा विषय आहे. त्यात परीक्षा रद्द झाल्याने आता अकरावी आणि पुढच्या शिक्षणाचे प्रवेश कसे होणार, असे प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहेत, तर हुशार, ॲव्हरेज विद्यार्थ्यांतील फरक गरजेचा असून, तो कसा मूल्यांकित करणार, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
दहावीचे मूल्यांकन कशा पद्धतीने होईल, हेही अद्याप स्पष्ट नसले तरी सीईटी आणि मूल्यांकनासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी १७ टक्के शाळांनी मूल्यांकनाला असमर्थता दर्शविली आहे, तर ३५ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीला नकार दिला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर झाला असून, त्यासंदर्भात काय निर्णय होतो याबद्दल विद्यार्थी, शिक्षकांत उत्सुकता असून, अनेक अनुत्तरित प्रश्नांचे समाधान कसे होईल, यावर सध्या खल सुरू आहे.
---
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचा संभ्रम कायम
--
तंत्रनिकेतन आणि आयटीआयमध्ये प्रवेश हे दहावीच्या गुणांच्या आधारे होतात. त्यामुळे सीईटी झाली, तर त्याचे गुण त्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील की अंतर्गत मूल्यमापनावर हे प्रवेश होतील. याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नसल्याने तंत्रनिकेतन आणि आयटीआयसाठी इच्छुकांमध्येही संभ्रम कायम आहे.
--
ऑनलाइन सीईटी झाली, तर ग्रामीण भागाचे काय ?
---
शिक्षण विभाग आजही जिल्ह्यातील अकरावीत नेमके विद्यार्थी किती हे ठामपणे सांगायला तयार नाहीत. इंटरनेटची सुविधा, गॅझेटची उपलब्धता, इतर तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत ऑनलाइन शिक्षणाला ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिसाद जिल्ह्यात मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन सीईटीवर शिक्षक, पालकांतून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
---
ऑफलाइन परीक्षा झाली तर कोरोनाचे काय?
---
राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने शाळेत परीक्षा घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा झाल्यास कोरोनाचे काय, असा सवाल शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.
----
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार ?
--
२३ नोव्हेंबर २०२० ला शाळा सुरू झाल्या. त्यानंतर नियमित शैक्षणिक कार्यावर आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडणींवरच भर दिला गेला. परीक्षा रद्द करावी लागणार हे किंवा तसा निर्णय होण्यापूर्वी सूचना मिळाल्या असत्या तर लेखी, तोंडी, सराव परीक्षांतून अंतर्गत मूल्यमापनाची काहीतरी तयारी करता आली असती. विद्यार्थी हुशार किंवा ॲव्हरेज आहे, हे तरी ठरविणे गरजेचे आहेच. शेवटी दहावी हा पुढील शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचे कोडे सध्यातरी सुटलेले नाही.
---
काय म्हणते आकडेवारी
अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा-४४०००
शहरातील एकूण जागा-३१,४७०
---
शिक्षक, प्राचार्य काय म्हणतात...
---
लेखी, तोंडी किंवा सराव परीक्षा झाल्या नाहीत. परीक्षेचा ८० आणि २० गुणांचा पॅटर्न आहे. याचे गुणांकन कसे होईल याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. खेड्यात ऑनलाइन शिक्षणाची ४० टक्के विद्यार्थ्यांकडेही व्यवस्था नव्हती. कोरोनामुळे प्रत्यक्ष वर्गातही १०० टक्के हजेरी नव्हती. दहावी पाया आहे. तेथूनच पुढच्या कोणत्या दिशेला जायचे हे ठरले. मूल्यांकन, सीईटीबद्दल अद्याप राज्य मंडळाकडून स्पष्टता नाही.
-जी. व्ही. जगताप, पर्यवेक्षक, जि. प. प्रशाला, सोयगाव
----
परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यापूर्वी मूल्यांकन, अकरावी प्रवेश कसे होणार, याची उकल करून नंतर निर्णय व्हायला पाहिजे होता. मूल्यांकन आणि सीईटीबद्दल मिळालेला प्रतिसाद अत्यल्प आहे. हे अत्यल्प लोक बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवू शकत नाहीत. ज्यांनी सर्वेक्षणात भाग घेतला त्यांच्याकडे ऑनलाइनची साधने आहेत; पण ज्यांच्याकडे ही साधणे नाहीत अशांचे काय होणार?
-अनिल देशमुख, मुख्याध्यापक, जि. प. प्रशाला, गणोरी.
---
दहावीची पहिल्या दिवसापासून तयारी करणाऱ्या आणि हुशार विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द झाल्याने नुकसान झाले. पुढे काय होणार या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मी निरुत्तर होते. ज्यांनी मेहनत केली त्यांना त्याचे फळ मिळाले पाहिजे. सीईटी व्हावी. त्यासाठीच्या प्रश्नांची निवड, सर्वंकष विषयांचा समावेश त्यात गरजेचा आहे, तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांनाही त्या परीक्षेत कसे सामावून घेतले जाईल याचाही विचार व्हावा.
-सय्यद बुशरा नाहीद, सहशिक्षिका, जि. प. प्रशाला, वाळूज.