औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती मिळावी, या उद्देशाने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (दि. १६) ‘सीजीओ' अर्थात को- गव्हर्न्मेंटल ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचे सूतोवाच केले. सामाजिक संघटनांच्या सहकार्याने चालणारे शासकीय कामकाज म्हणजेच ‘सीजीओ' होय. राज्यात किंवा देशात अशा पद्धतीचा उपक्रम कोठेच राबविण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी ‘सीजीओ’वर भविष्यात काम केल्यास त्याचा शहराच्या विकासासाठी मोठा फायदा होईल, असे मत वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
एकेकाळी आशिया खंडामध्ये वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादचा नावलौकिक होता. मागील सहा-सात वर्षांमध्ये मात्र शहरात येणारे नवनवीन प्रकल्प पळविण्यात आले. महापालिकेचा कारभारही शहराच्या विकासाला पूरक ठरला नाही. शहराच्या विकासाची दिशाच भरकटून गेल्याचे चित्र दिसत आहे. पाण्यासारख्या मूलभूत समस्येसाठीही लोक त्रस्त आहेत. या परिस्थितीत आदित्य ठाकरे यांनी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शनिवारी शहरातील मान्यवरांशी चर्चा करताना ‘सीजीओ’चा विचार मांडला. या संदर्भात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मान्यवरांनी मांडलेल्या विचारांचा हा आढावा.
छोटे-छोटे प्रश्न मार्गी लागले तरी खूप
राज्य शासन आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना मिळून एकत्रितरीत्या काम केल्यास त्याचा खूप फायदा होईल. दोन महिन्यांतून एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या छोट्या-छोट्या प्रश्नांवर बैठका झाल्यास ते मार्गी लागतील. पालकमंत्री सुभाष देसाई शहराच्या विकासासाठी खूप सकारात्मक आहेत. त्यांचाही या उपक्रमाला फायदा होईल.
- मुकुंद कुलकर्णी, उद्योजक