औरंगाबाद : शहरातील सिडको एन-९, एम-२ आणि बजरंग चौक परिसरात मंगळसूत्र चोरट्यांनी शुक्रवारी सकाळी धुमाकूळ घालत दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्या. तर एका महिलेच्या सजगतेमुळे तिसऱ्या ठिकाणी मंगळसूत्र हिसकावण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फ सला. या घटनेने सिडकोत खळबळ उडाली असून सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला.
सिडको एन-९ मधील प्रतापगडनगर येथील रहिवासी ललीता विठ्ठल नागे (५८) या मैत्रीणीसह शुक्रवारी सकाळी स्वाध्यायच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर सव्वा आठ वाजेच्या सुमारास दोघी पायी घरी जात होत्या.त्याचवेळी दोन दुचाकीवरून चार जण त्यांच्याजवळून पुढे गेले. त्यापैकी एका दुचाकीस्वार दोन जणांनी हेल्मेट घातलेले होते तर दुसºया दुचाकीवरून विना हेल्मेट असलेले तरूण परत आले. हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांनी तक्रारदार नागे आणि त्यांच्या मैत्रिणीच्या मधून दुचाकी घातली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या एका हेल्मेटधारीने नागे यांच्या गळ्यातील मिनी गंठण आणि मोठ्या मंगळसुत्राच्या पोतीची काही सोनसाखळी झटका देऊन हिसकावून घेतली. त्यानंतर चोरटे भरधाव निघून गेले. यावेळी नागे आणि त्यांच्या मैत्रिणींनी आरडाओरड करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला,मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले.
गोदावरी हायस्कुलजवळ साडेआठ वाजेच्या झालेल्या अन्य एका घटनेत चोरट्यांनी आशा अनिल देवळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली. आशा या शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अंगण झाडत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांपैकी एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने त्यांच्याकडे काकू हा पत्ता सांगता का, असे विचारून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. ही सोनसाखळी किती ग्रॅमची आहे, हे समजू शकले नाही.
तिसरी घटना सिडको एन-७ बजरंग चौक परिसरात घडली. बजरंग चौकाजवळील रहिवासी महिला घरासमोरील अंगणात झाडत असताना काळ्या रंगाची दुचाकी अचानक त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्यांना आरोपींचा संशय आल्याने त्या सतर्क झाल्या, यावेळी दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने चोरटे तेथून पसार झाले.
या तिन्ही घटनांची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे, कर्मचारी राजू बनकर,प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, इरफान खान आणि अन्य कर्मचाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन तक्रारदारांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.