औरंगाबाद: रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो, असे सांगून हात धरून वर्दळीचा जालना रोड ओलांडून पुलाखाली नेऊन ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र एका जणाने हिसकावून नेले. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी सेवन हिल उड्डाणपुलाखाली घडली.
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, सिंदोन-भिंदोन येथील रहिवासी अनुसयाबाई शिंदे (वय ५८)यांना पिसादेवी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जायचे होते. यामुळे त्या गावाहून औरंगाबादेत आल्या. सेवन उड्डाणपुलाखाली रिक्षा थांब्यावर त्या उभ्या राहिल्या आणि जालना रोड ओलांडण्यासाठी वाहनांची संख्या कमी होण्याची प्रतीक्षा करू लागल्या.
त्याचवेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि आजी तुम्हाला कुठे जायचे आहे, असे त्यांनी विचारले. अनुसया यांना वाटले की, हा रिक्षाचालक असावा, आणि प्रवासी म्हणून आपल्याला विचारत असावा, यामुळे त्यांनी पळशीला जायचे असल्याचे सांगितले. चला आम्ही तुम्हाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करतो आणि रिक्षापर्यंत घेऊन जातो असे म्हणत एक जणाने त्यांचा हात पकडला आणि रस्ता ओलांडून सेवनहिल पुलाखाली नेले. यावेळी अचानक एकाने त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र हिसका देवून तोडून घेतले आणि दोघेही तेथून सुराणानगरच्या दिशेने पळून गेले. यावेळी अनुसयाबाई यांनी चोर, चोर अशी आरडाओरड करीत त्यांच्यामागे पळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच, गुन्हेशाखेसह जिन्सी ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.