औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीच्या सदस्य निवडीत आज प्रचंड राजकारण पाहायला मिळाले. विद्यमान स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सदस्यांच्या यादीत स्वतःचे नाव टाकलं, त्यामुळे शहर विकास आघाडीत मोठी फुट पडली. तसेच याच मुद्द्यावरून भाजप व आघाडी सदस्यांनी निवड प्रक्रिये दरम्यान प्रचंड गोंधळ घालत बारवाल यांना शिवीगाळ केली.
दरम्यान, येणाऱ्या वर्षभरात स्थायी समितीसमोर कोट्यवधी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागावी यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांमध्ये आज चढाओढ पाहायला मिळाली. आज निवड होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सेनेच्या कोट्यातून एकजणाची निवड होणार होती. तसेच यंदा स्थायी समितीचे सभापतीपद सेनेला मिळणार आहे. यामुळे या एका पदासाठी सेनेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीपासून खा. चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे चिरंजीव ऋषी खैरे यांची निवड व्हावी या दृष्टीने व्यूव्हरचना आखण्यात आली. यासोबतच नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनाही सदस्यपद हवे होते. मात्र, खा. खैरे यांचा जंजाळ यांना विरोध आहे. अशा परिस्थितीत क्रांतीचौक वॉर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांना स्थानिक सेना नेत्यांनी संधी दिली.
नव नियुक्त स्थायी समिती सदस्य : शिल्पाराणी वाडकर ( शिवसेना), भाजपकडून पुनम बमणे, जयश्री कुलकर्णी, एमआयएम कडून खान सायराबानो अजमल, खान नसरीम बेगम, काॅग्रेसतर्फे अब्दुल नवीद अब्दुल रशीद, तर अपक्षांमधून गजानन बारवाल व सत्यभामा शिंदे हे सदस्य झाले.