लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दुपारी ३.३० वाजता एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून अभूतपूर्व असा गोंधळ घातला. सभागृहात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करीत अर्वाच्च भाषेत महिला नगरसेविकांसमोर शिवीगाळ केली. गोंधळी नगरसेवक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सभागृहातील प्लास्टिकच्या खुर्च्या उचलून महापौरांच्या अॅन्टी चेंबरकडे धाव घेतली. एक खुर्ची महापौरांच्या अंगावरच भिरकावण्यात आली. या घटनेत महापौरांना फारसा मार लागला नाही; पण सभागृहातील या अशोभनीय वर्तणुकीबद्दल एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन, शेख जफर यांचे सभागृहातील सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. त्यांच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, गैरवर्तणूक करणा-या नगरसेवकांचा शासनाला अहवाल द्यावा, असे आदेश महापौर बापू घडमोडे यांनी दिले.महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाल २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी त्यांनी शेवटची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सकाळी ११.३० वाजता सुरू होणारी सभा दुपारी १.३० वाजता सुरू झाली. सभेत सर्वप्रथम पाणी प्रश्नावर चर्चा घेण्याचा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही आपले शेवटचे मनोगत व्यक्त करून पाणी प्रश्नावर चर्चा सुरू केली. प्रत्येक नगरसेवक आपल्या वॉर्डातील पाणीप्रश्न मांडत होता. या चर्चेत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने तेल ओतण्याचे काम केले. ज्यांच्या वॉर्डात पाणीपट्टी वसुली जास्त त्यांना जास्त पाणी द्या. या मुद्यावर एमआयएम आणि काही भाजप नगरसेवक बरेच आक्रमक झाले. सभागृहाची चर्चा भरकटलेली असताना एमआयएम नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर धावून आले. यावेळी राजदंडाची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा रक्षक प्रमुख जाधव पुढे सरसावले. एमआयएम समर्थक तथा अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांनी जाधव यांना धक्का देऊन ढकलून दिले. सुरक्षा रक्षक अक्षरश: जमिनीवर कोसळले. तेवढ्यात एमआयएमचे नगरसेवक शेख जफर (बिल्डर), सय्यद मतीन त्यांच्या अंगावर धावून गेले. या गोंधळामुळे महापौरांनी नगरसेवक अजीम अहेमद, सय्यद मतीन, शेख जफर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा करून सभा तहकूब केली. चिडलेल्या नगरसेवक मतीन, जफर यांनी महापौरांच्या दिशेने खुर्च्या भिरकावणे सुरू केले. त्यात एक खुर्ची महापौरांना लागली. त्यामुळे बापू घडमोडे यांनी अॅन्टी चेंबरकडून परत येत सभा सुरू केली.याच दरम्यान, नगरसेवक मतीन, जफर यांनी महापौरांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवून नेला. सभागृहात राजदंड घेऊन ते राजरोसपणे फिरत होते. अखेर सुरक्षारक्षकांनी राजदंड जप्त करून परत महापौरांसमोर आणून ठेवला.वारंवार एमआयएमकडून राडाएमआयएमचे मोजकेच नगरसेवक सभेत राडा करीत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सय्यद मतीन यांनी वंदेमातरमचा वाद उकरून काढला होता. त्याला जफर बिल्डर यांनी साथ दिली होती. त्यांच्या या प्रकारामुळे महापौरांनी एक दिवसासाठी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मतीन यांनी स्थायी समितीच्या सभेतही स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकावरून राडा केला होता.महापालिकेत कमांडो फोर्ससर्वसाधारण सभेत एमआयएमकडून झालेल्या राड्यानंतर आ. इम्तियाज जलील विरोधी पक्षनेते फिरोज खान यांच्या कक्षात येऊन बसले. त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चाही केली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी सिटीचौकचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम मोठा फौजफाटा घेऊन महापालिकेत दाखल झाले. काही वेळेनंतर नगरसेवक, मनपा कर्मचारी, पत्रकारांना सोडून सर्वांना मनपा इमारतीतून बाहेर काढण्यात आले. कमांडो फोर्स मागवून महापौरांना सुरक्षा देण्यात आली. सुरक्षेत महापौरांना रेल्वेस्टेशन येथील बंगल्यावर सोडण्यात आले. महापौर बंगल्यावरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
सभेत महापौरांवर भिरकावल्या खुर्च्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:52 AM