छत्रपती संभाजीनगर : चैतन्यच्या अपहरणाचा कट उघड झाला असून, आता आपल्याला अटक अटळ आहे, याची जाणीव पाचही अपहरणकर्त्यांना झाली हाेती. त्यामुळे अटकेपूर्वीच त्यांनी मोबाइलमधील सर्व डेटा उडवून टाकला. दरम्यान, अपहरणकर्त्यांचा सहावा साथीदार हर्षल विनोद चव्हाण (२०) याला पोलिसांनी गुरुवारी रात्री ब्रह्मपुरीतून अटक केली.
चैतन्य तुपे या सातवर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (वय २१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (२०, चौघेही रा. ब्रह्मपुरी, ता. जाफ्राबाद), शिवराज ऊर्फ बंटी विलास गायकवाड (२०, रा. आळंद) यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या या कटाची इत्थंभूत माहिती असलेल्या हर्षललाही गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांच्या पथकाने गुरुवारी रात्री गावातून अटक केली. न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे तपास करत आहेत.
टक्केवारीचे आश्वासन, नंबर प्लेट तयारहर्षल अन्य पाच आराेपींचा बालमित्र आहे. त्याला २ कोटींमधून हिस्सा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यामुळेच त्याने दोन बनावट नंबर प्लेट बनवण्याची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे, पाच मित्रांना अटक झाल्यानंतरही पोलिस आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, असा अतिआत्मविश्वास असल्याने तो घरीच थांबून होता.
पोलिसांकडून कलम चुकलेहर्षलला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी कागदपत्रांत सदोष मनुष्य वधाच्या कलमाचा (बीएनएस १०५) उल्लेख केला होता. सरकारी वकिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी न्यायालयात कलम बदलण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने तोंडी मागणी मान्य करत लेखी अर्ज करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी तत्काळ अर्ज सादर केल्यानंतर सुनावणी पुन्हा सुरू झाली.