डिझेलची भाववाढ, टोलनाका दरवाढ रद्द करण्याची मागणी
औरंगाबाद : मागील ११ महिन्यांत डिझेलचे भाव लिटरमागे २० रुपयांनी महागले, परिणामी १०० कि. मी. मालट्रकचा डिझेलवरील खर्च २ हजार रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे करार केलेल्या कंपन्यांनी गाडीभाडेवाढ करण्यास नकार दिल्याने मालवाहतूक व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
डिझेलचे दर कमी करा, टोलनाकाचे वाढीव दर रद्द करा या मागणीसाठी मालवाहतूकदारांनी केंद्र सरकारला दिलेली नोटीसही मुदत संपण्यास ३ दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर देशव्यापी चक्काजाम करण्यात येणार असल्याने नागरिकांवर महागाईवाढीच्या आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
देशातील ८५ ते ९० टक्के मालवाहतूक मालट्रकने होते. देशातील ३२ राज्यांत एकूण २०० हून अधिक राष्ट्रीय महामार्ग आहेत. या महामार्गावरून दररोज २ कोटींपेक्षा अधिक वाहने धावतात. ही मालवाहतूक करताना डिझेल, टोलनाका येथील टोलचे दर १५ ते २० टक्क्यांने वाढले आहेत. मालवाहतूकदरांनी सांगितले की, मार्च २०२० या महिन्यात डिझेलचे भाव ६७.१२ रुपये एवढे होते. गुरुवारी ८७.४७ रुपये म्हणजे, मागील ११ महिन्यांत लिटरमागे २०.३५ रुपयांनी डिझेल महागले आहे. १०० कि. मी अंतराला ६७०० रुपयांचे डिझेल लागत असे. आता ८७५० रुपये खर्च येत आहे. म्हणजे, डिझेल खर्च २०५० रुपयांनी वाढला आहे.
मालवाहतुकीसाठी ७० टक्के व्यावसायिकांच्या मालट्रक कंपन्यांच्या माल वाहतुकीसाठी करार झाला आहे. कंपन्या मालवाहतूक भाडे वाढून देण्यास तयार नाही. आता मार्चनंतर जुना करार संपत आहे.
डिझेलच्या किमती १५ ते २० रुपयांनी कमी कराव्यात, टोलनाक्याचे वाढलेले दर कमी करण्यात यावे, डिझेल व पेट्रोलचा समावेश जीएसटीत करावा, या मागणीसाठी १४ फेब्रुवारीला अखिल भारतीय मालवाहतूक संघटनेने केंद्र सरकारला नोटीस दिली होती. त्याची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे.
चौकट
चक्काजामसाठी सज्ज
डिझेल व टोलनाका दरवाढीमुळे मोठ्या मालवाहतूकदारांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. डोक्यावरून पाणी चालले आहे. आता पुढील महिन्यात चक्काजाम करण्याची तयारी सुरू असून अखिल भारतीय मालवाहतूक संघटनेचा आदेश येताच आम्ही आंदोलन सुरू करू.
फय्याज खान
अध्यक्ष, औरंगाबाद मालवाहतूकदार संघटना