लातूर : शहर व परिसरात मंगळवारी सकाळी सूर्यनारायणाची तीव्र किरणे आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण यामुळे दिवसभर उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता़ गेल्या दोन दिवसानंतर पुन्हा तापमान वाढले असून मंगळवारी पारा ४० अंश सेल्सियसवर पोहोचला होता़ उकाड्यामुळे अंगाची लाही- लाही होत होती़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाचे चटके जास्त बसत आहेत़ त्यामुळे आबालवृध्द हैराण होत आहेत़ सध्या वैशाख महिना असून याच महिन्यात उन्हाचा सर्वाधिक त्रास जाणवतो़ गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागल्या़ त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकंती होत होती़ गत पावसाळ्यात जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कमी जाणवत आहेत़ सद्यस्थितीला जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत लातूर तालुक्यास पाणीटंचाई तीव्र जाणवत आहे़ यंदाच्या वैशाख व मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र उन्हाचे चटके बसत आहेत़ चालू महिन्यात सर्वाधिक तापमान २ मे रोजी नोंदले गेले असून ते ४१ अंश सेल्सियस आहे़ त्यानंतर मात्र, पारा उतरला़ त्यामुळे आबालवृध्दांच्या जीवाची होणारी काहिली कमी झाली होती़ १२ मेपासून पारा चढण्यास सुरुवात झाली़ या दिवशी तापमान ३७ अंश सेल्सि़ होते़ १३ रोजी ३७़२, १४ रोजी ३७, १५ रोजी ३७ अंश सेल्सि़ तापमान झाले़ त्यानंतर १६ रोजी ३६़५ तर १७ रोजी ३६ अंश सेल्सि़ होते़ १८ रोजी तापमानात वाढ होऊन ते ४०़५ अंश सेल्सि़ वर पोहोचले़ १९ रोजी ४० अंश सेल्सि़ तापमान होते़ गेल्या वर्षी १९ मे रोजी ३६़५ अंश सेल्सि़ असे तापमान होते़ वैशाख वणव्यापासून बचाव करण्यासाठी आबालवृध्द शीतपेयांचा आधार घेत आहेत़ त्याचबरोबर दुपारच्यावेळी झाडांच्या सावलीचा आसरा घेत आहेत़ त्यामुळे शहरातील पार्क गजबजून गेलेले पाहावयास मिळत आहेत़ (प्रतिनिधी)
तापमानाच्या पार्याने केली चाळिशी पार..!
By admin | Published: May 20, 2014 12:22 AM