‘नीट’च्या निकालास खंडपीठात आव्हान; 12 जूनला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:23 AM2019-06-08T02:23:41+5:302019-06-08T06:10:22+5:30
वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा; याचिकेवर पुढील सुनावणी १२ जून रोजी
औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेल्या ‘नीट-२०१९’चा निकाल ५ जून रोजी जाहीर झाला. त्यात जीवशास्त्राच्या तीन प्रश्नांचे आणि रसायनशास्त्रातील एका प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेले पर्याय चुकीचे होते. विद्यार्थ्यांची उत्तरे बरोबर असूनही ती चूक असल्याचे ग्राह्य धरण्यात आले. परिणामी, विद्यार्थ्यांचे एकूण २० गुणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांनी शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. त्यावर १२ जून रोजी न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांनी वरील प्रश्नांची अचूक पर्यायांद्वारे दिलेली उत्तरे ग्राह्य धरली तर त्यांच्या एकूण गुणांत १६ गुणांची वाढ होते. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही परीक्षा घेणारी संस्था असून, या संस्थेने ऐनवेळी उत्तर सूचीमध्ये केलेल्या बदलामुळे गोंधळ निर्माण झाला. परिणामी, गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेच्या निकालाबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थी आणि पालकांनी संबंधित विषयांच्या तज्ज्ञांकडून खातरजमा करून अॅड. अनिल गोलेगावकर आणि अॅड. मधुर गोलेगावकर यांच्यामार्फत खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.