औरंगाबाद : शहर पोलिसांच्या हद्दीत मागील दोन दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. हे सुरु असताना पडेगाव भागातील दत्तनगर आणि माजी सैनिक कॉलनीत दोन घरे फोडून चोराने सोन्या-चांदीचे लाखोंचे दागिने लंपास केले. या घटना ६ एप्रिलच्या रात्री घडल्या.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा रोहिदास पाटील (रा. दत्तनगर, पोलीस कॉलनीजवळ, पडेगाव) या परिवारासह सकाळी साडेसहाच्या सुमारास शिर्डी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. ही संधी साधून चोराने त्यांच्या घराचे कुलूप, कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट मधील एक तोळ्याची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅमचे कानातील झुमके, १० ग्रॅमचे मिनी गंठण आणि ६० ग्रॅमचे तीन चांदीचे शिक्के असा १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. पाटील कुटुंबीय सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतले. तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
दुसऱ्या घटनेत द्वारकाबाई रामदास कांबळे (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) या ६ एप्रिलला रात्री साडेआठच्या सुमारास घराला कुलूप लावून मुलाच्या घरी गेल्या होत्या. मध्यरात्री चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅमचे झुंबर, ५ ग्रॅमची सोन्याची एकदाणी, १ तोळ्याचा नेकलेस, सोन्याच्या दोन पोत, ३ भाराचे चांदीचे कडे, सोन्याचे मणीमंगळसूत्र, देवीचा चांदीचा कंबरपट्टा, चांदीचा शिक्का, चांदीचा टोप, ३ ग्रॅमचे सोन्याचे वेल, २ ग्रॅमची सोन्याची नथ असा १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी नऊच्या सुमारास द्वारकाबाई घरी आल्या तेव्हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक पाडुरंग डाके करीत आहेत.