औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या९ खासदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात ‘निवडणूक याचिका’ दाखल झाल्या आहेत. खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती या याचिका सुनावणीसाठी संबंधित न्यायपीठांकडे वर्ग करतील. त्यानंतर या निवडणूक याचिकांवरील सुनावणी सुरू होईल.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, परभणीचे खासदार संजय जाधव, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे आणि नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरुद्ध या निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत.औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पराभूत उमेदवार शेख नदीम यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली. दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या आधारे मतदानाचे आवाहन करणे, खर्च लपविणे आदी आक्षेप याचिकेत घेण्यात आले आहेत.बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अॅड. अजित काळे यांच्यामार्फत आव्हान दिले. डॉ. मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचा त्यांचा आक्षेप आहे.नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्याविरुद्ध शंकर वसावे यांनी अॅड. ज्ञानेश्वर बागूल यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यामध्ये, त्यांनी ज्या बॉण्डपेपरवर शपथपत्र सादर केले तो बनावट आहे, त्यांनी शपथपत्र पूर्ण भरलेले नाही, अनेक जागा रिकाम्या सोडल्या आहेत. त्यांच्यावर अवलंबितांची चुकीची नावे दिली असून, यात वडील माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या, हे दाखवून देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत उघड केलेले नाहीत, आदी आक्षेप घेतले आहेत.उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरुद्ध मनोहर अनंतराव पाटील, जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध डॉ. शरदचंद्र वानखेडे, नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याविरुद्ध यशपाल शिंदे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध मोहन फत्तूसिंग राठोड, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याविरुद्ध आलमगीर खान आणि लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याविरुद्ध रामराव गारकर यांनी विविध आक्षेप घेणाऱ्या याचिका सादर केल्या आहेत.
नवनिर्वाचित ९ खासदारांच्या निवडीला खंडपीठात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 11:50 PM
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या९ खासदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ‘निवडणूक याचिका’ दाखल झाल्या आहेत. खंडपीठातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती या याचिका सुनावणीसाठी संबंधित न्यायपीठांकडे वर्ग करतील. त्यानंतर या निवडणूक याचिकांवरील सुनावणी सुरू होईल.
ठळक मुद्देमराठवाड्यातील सर्वच खासदारांविरुद्ध याचिका