रमेश शिंदे , औसामागील तीन ते चार महिन्यांपासून औसा शहरासह तालुक्यात चोरट्यांनीच पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. तीन महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. चोरटे भरदुपारी हात साफ करीत असून पोलिसांचा तपास मात्र शून्यातच आहे. औसा शहरात ज्या काही मोठ्या घरफोड्या झाल्या त्याचे गुन्हे नोंदही आहेत. पण लहान-सहान घरफोड्यांचे गुन्हे नोंद होत नाहीत. त्यामुळे चोऱ्यांची ही मालिका वरिष्ठांच्या नजरेसमोर येत नाही. ऐन दिवाळीत भर दुपारी तीन-चार घरफोड्या झाल्या असून, आता तरी औसा पोलिस झोपेतून जागे होणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. औसा तालुक्यात औसा, किल्लारी व भादा हे तीन पोलिस ठाणे व औसा येथेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून औसा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरात तर भरदिवसा घरफोड्या करण्याची मालिकाच चोरट्यांनी सुरू केली आहे. प्रत्येक तीन-चार दिवसांनी घरफोडी ठरलेलीच आहे. तीन महिन्यांपूर्वी नागरसोगा येथील मोहन मुसांडे यांच्या घरी ७ लाखांची चोरी झाली. त्यानंतर औसा शहरातील एका कापड दुकानातून ५० हजार लंपास करण्यात आले. गौरीशंकर मिटकरी या व्यापाऱ्याचे घरही भरदुपारी फोडले. मुख्याध्यापक अनिल मुळे, शिक्षक बालाजी लिंबाळकर, सुरेश दुरुगकर यांच्यासह अनेकांची घरे फोडली. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. या लोकांनी पोलिसांत तक्रारी दिल्या. पण ज्यांचा कमी ऐवज चोरीस गेला, त्यांनी मात्र पोलिसांकडे तक्रारी देण्याचे टाळले. काही जण तक्रार करायला गेले. तर पोलिसांनीच त्यांना सल्ला दिला की तक्रार करून काय मिळणार आहे म्हणून अनेक तक्रारी दाखलच झाल्या नाहीत. पण या तीन ते चार महिन्यांत ५० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. दिवाळीत ऐन पाडव्याच्या दिवशी बसस्थानकाजवळील अन्नपूर्णा नगरमधील टाचले व अन्य एक घर फोडले. त्याच रात्री हनुमान मंदिरानजिक एक किराणा दुकान तर भाऊबीजेदिवशी मिटकरी यांचे घर फोडले. दोन दिवसात चार ठिकाणी चोऱ्या झाल्या. पण एकही गुन्हा दाखल नाही. चोरी झालेल्या एकाने सांगितले की, चोरी झाली खरी. पण तक्रार देणे म्हणजे ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी अवस्था आहे. म्हणून अर्ज दिला नसल्याचे सांगितले. एकूणच चोरट्यांनी मात्र औसा पोलिसांनाच आव्हान दिले आहे.औसा शहरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांचा तपास लागत नसल्याने आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: सध्या दिवसा चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, दिवसा घर उघडे ठेवणे धोकादायक ठरत आहे. त्याचबरोबर घरास कुलूप लावलेले दिसल्यास चोरटे अशी घरे फोडून घरातील ऐवज लंपास करीत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरास कुलूप लावून बाहेरगावी जाणे धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
चोरट्यांचे आव्हान; भरदुपारी घरफोड्या !
By admin | Published: October 26, 2014 11:43 PM