औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पाच हजार ‘विद्युत सहाय्यक’ पदाच्या भरती ( recruitment process for five thousand electrical assistant posts) प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान ( Aurangabad High Court ) देण्यात आले आहे. या भरतीमधील बेस्ट ऑफ ५ च्या आधारे मिळालेल्या गुणांची नोंद केलेल्या उमेदवारांची निवड रद्द करावी. निवड यादीत प्रवर्गनिहाय सामाजिक, समांतर आरक्षण योग्यरीत्या दिल्याची पडताळणी व पुनर्मूल्यांकन करावे, दहावीच्या एकूण सरासरी गुणांच्या आधारावर नव्याने दुरुस्त निवड यादी प्रसिद्ध करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेची पुढील सुनावणी २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यकांची ५ हजार पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. महावितरणने ८ ऑक्टोबर रोजी निवड यादी प्रसिद्ध केली आहे. प्रमाणपत्रांची छाननी २१ व २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जाहीर केलेल्या निवड यादीनुसार एकूण ४५३४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तसेच विविध प्रवर्गांकरिता आरक्षित केलेल्या पदांचा तपशील नमूद केला आहे.
सदर निवड यादीस प्रकाश गायकवाड, योगेश रामराव खांडरे, महेश चौधरी, सुजीत बोदमवाढ, प्रदीप हमद आदींनी ॲड. शहाजी घाटोळ पाटील यांच्या मार्फत खंडपीठात आव्हान दिले आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन केले नाही. जाहिरातीप्रमाणे एकूण सरासरी गुणांच्या आधारे निवडीची अट असताना बहुसंख्य उमेदवारांनी नमूद केलेल्या बेस्ट ऑफ ५ गुणांच्या आधारावर निवड यादी प्रसिद्ध केली आहे. सदर उमेदवारांची निवड रद्द करावी. नव्याने दुरुस्त निवड यादी प्रसिद्ध करावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.