पुणे/ औरंगाबाद : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्यामुळे तामिळनाडू, पॉंडेचरी यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी सकाळी पाँडेचरीपासून ६०० किमी तर चेन्न्ईपासून ६३० किमी दूर होते. मंगळवारी पहाटे त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. २५ नोव्हेंबर रोजी ते कराईकल आणि ममालीपूरम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम २६ नोव्हेंबरपर्यंत जाणवणार आहे. आंध्र प्रदेश किनारपट्टी, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा परिसरात २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बऱ्याच भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. २५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊस२६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.