औरंगाबाद : काँग्रेसशी आघाडीची शक्यता कमीच आहे. आम्ही २८८ जागा जाहीर करू, आमचा लढा भाजपशी आहे, अशी भूमिका वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौलवी आणि उलेमांची मते जाणून घेण्यासाठी आज बाळासाहेब औरंगाबादेत आले होते. त्याआधी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी एमआयएमने शंभर जागांची मागणी केली आहे, यासंदर्भात खडसावले की, उद्या ते दोनशे जागा मागतील. मागायला काय जातंय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अॅड. आंबेडकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी आधी आम्ही लहान ओबीसींची यादी जाहीर करू. तोपर्यंत काँग्रेसने आम्ही भाजपची बी टीम कसे हे सिद्ध केले तर आम्ही बोलणीस तयार राहू. काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, हे त्यावेळीही सांगत होतो, आताही तीच स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत मौलवींनी मुस्लिम मते काँग्रेसकडे वळवली, यात शंकाच नाही. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनीही ते जाहीरपणे कबूल केलेले आहे. मुस्लिम मते मौलवींच्या हातात आहेत असा याचा अर्थ होतो, असे सांगत, यावेळी तीन तलाक आणि ३७० कलम रद्द करण्याच्या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने सभात्यागाची भूमिका घेतली. मग त्यांच्याबरोबर का राहायचे, असा प्रश्न मुस्लिम समाजास पडला आहे. म्हणूनच ते एक पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीबरोबर राहतील, असा विश्वास मला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, असे विचारता ते उत्तरले, उमेदवारच सक्षम द्यायचे असे धोरण ठरवले आहे. एका सर्व्हेनुसार ७० टक्के मतदारांना काम करणारा आमदार हवाय. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दाखवल्याने उमेदवारांना वाटते की, काम केले नाही तरी चालेल. ही चुकीची प्रथा भाजपने सुरू केली.
‘मदत’ हा शब्द नाही...दुष्काळात आणि आता पूर आला असतानाही हे सरकार उदासीन आहे. मदत करणे हा शब्द यांच्या विचारसरणीत नाही, तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी यांची प्रवृत्ती आहे. या शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. अमित भुईगळ, रामभाऊ पेरकर व अनेक कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
ईव्हीएम हटेल,तर हे सरकार हटेलईव्हीएम हटेल, तर हे सरकार हटेल, हे नक्की, तसेच ईव्हीएममध्ये गडबड आहे, हे सिद्ध करायला काही हॅकर्स ग्रुप तयार आहेत. अगदी न्यायालयातसुद्धा, असे विधान अॅड. आंबेडकर यांनी केले.
सुजात आंबेडकर लढणार नाही...सुजात आंबेडकर हा माझा मुलगा अवघा २२ वर्षांचा आहे. शिवाय तो पत्रकारितेच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला जाणार आहे, त्यामुळे त्याच्या निवडणूक लढण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण बाळासाहेबांनी दिले.