औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यापासून शिवसेनेतील ठाकरे गटाचे नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. यातच काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यामुळे शिंदे शिवसेना नेत्यांच्या रडारवर आले आहेत. औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करताना जीभ घसरली. आता खैरेंनी शिंदेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. यावरुन चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्या वक्तव्याविरोधातच शिंदे गटाकडून खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबदमधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत खैरे काय म्हणाले होते?'एकनाथ शिंदेंचा मला भयंकर राग आलाय. या रिक्षावाल्याने इतके पैसे कुठून कमावले? शिवसेना फोडण्याचे काम केले. आनंद दिघे असते तर गद्दारी केल्यामुळे तुला उलटा टांगला असता. आनंद दिघेंच्या नावावर हे सगळं करतोय. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा भविष्यात विजय होणार आहे. ज्यांनी गद्दारी केली ते संपले हा इतिहास आहे,' अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी टीका केली होती.