छत्रपती संभाजीनगर: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. रविवारी(दि.01) राज्यभर 'जोडे मोरो' आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजेत, असे अशी मुक्ताफळे उधळल्याने खळबळ उडाली आहे.
मालवण येथील पुतळा पडल्यापासून महाविकास आघाडी सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरद पवार ) आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सरकारविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत आहेत. दरम्यान, आज मविआने राज्यात राज्य सरकारला जोडे मारो आंदाेलन छेडले होते. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यानिमित्ताने महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले.
खैरे नेमकं काय म्हणाले?याच पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना राज्यात दंगली झाल्या पाहिजे अशी मुक्ताफळे उधळली. एवढेच नव्हे तर राज्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कोणी विटंबना केली तर दंगली होतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरही दंगली का होत नाही? दंगली झाल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारविरोधात आंदोलन
रविवारी शहरातील क्रांती चौकात सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या मुख्यमंत्रीआणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची छायाचित्र असलेली बॅनर पोलिसांनी आंदोलकांशी झटापट करून हिसकावून घेतले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून क्रांतीचौक परिसर दणाणून सोडला.