छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभेत दोन जुने शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. सेनेते फुट पडल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा गद्दार विरुद्ध निष्टावान असा संघर्ष दिसून येत आहे. दरम्यान, ' खैरे खरे गद्दार' असा हल्लाबोल महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी केला. पाणी आणि रस्ते या जिल्ह्याच्या स्थानिक प्रश्नावर निवडणूक लढवणार असल्याचेही भुमरे यांनी यावेळी जाहीर केले.
आज सकाळी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीच्या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी भुमरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कधी स्वप्नात नव्हते आमदार होईल, लोकसभेची उमेदवारी मिळेल, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाले. ते मला एक सच्चा शिवसैनिक म्हणून नावानिशी ओळखत असेल. यातूनच पुढे विधानसभा तिकीट मिळाले. सहा वेळेस पैठण विधानसभेत आमदार म्हणून काम केले. आज बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. जसे पैठणच्या जनतेची सेवा केली तशीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेची सेवा करेल. जिल्ह्याच्या प्रश्नांना न्याय देईल. महत्वाचे म्हणजे मागील २० वर्ष खासदार असलेले खैरे यांनी पाणी आणि रस्त्यांचा प्रश्न सोडवला नाही. माझे प्राधान्य पाणी आणि रस्त्याचे प्रश्न महायुतीतील सर्व पक्षांच्या सहकार्याने प्राधान्याने सोडवणे हे असेल, टीकाटिप्पणी करण्यास आणखी भरपूर वेळ आहे, असेही भुमरे म्हणाले.
खैरेंवर केला हल्लाबोल'खैरे खरे गद्दार , पक्षात राहून त्यांनी गद्दारी केली. एकत्र असताना खैरे यांनी पक्षात गटबाजी केली, शिवसैनिकांना निवडणुकीत पाडले, आधीपासून खैरे गद्दार आहेत, आम्ही गद्दार नाहीत, असा हल्लाबोल भुमरे यांनी केला. तसेच २०१९ ला आम्ही महायुतीत लढलो, त्यानंतर दुसऱ्या आघाडीत जाण्याची गद्दारी कोणी केली ? एक दोघे फुटले तर ती गद्दारी असेल, इथे सगळा पक्ष एका बाजूला आहे. जनतेसाठी आम्ही गद्दार नाहीत, असा दावा भुमरे यांनी केला.