औरंगाबाद : शिवसेनेच्या जनसंपर्क मोहिमेत जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांना बाजूला ठेवत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बैठकीचा अजेंडा रविवारी प्रसिद्धीस दिला आहे. दानवेंना डावलून खैरेंनी आढावा बैठकींचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे त्या दोघांमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. बैठकीला गेले नाहीतर खैरेंची नाराजी आणि गेले तर दानवेंचा रोष ओढवून घ्यावा लागणार असल्यामुळे यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गोची होण्याची शक्यता आहे. ( Shivsena's Chandrakant Khaire avoids District President Ambadas Danve from Jansampark campaign )
शिवसेना शहर शाखेतर्फे ५ ते ९ जुलै दरम्यान शिवजनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे. शिवसेना नेते खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विधानसभा मतदारसंघनिहाय वॉर्डाचा आढावा व पदाधिकारी बैठक अभियानात घेण्यात येणार आहे. यात सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, संतोष जेजूरकर, बंडू ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, बप्पा दळवी, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, माजी सभागृह नेता विकास जैन, माजी गटनेते मकरंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका होणार आहेत. उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख आदींना बैठकीसाठी बोलविले आहे़. सदरील बैठकीत कोरोनाचे सर्व नियम तंतोतंत पाळले जातील, असा दावा करण्यात आला आहे.
कितीजण बैठकीला येणार याकडे लक्षमनपा निवडणुका अथवा संघटन बांधणी करण्याचा मुद्दा पुढे आला की, फुलंब्री मतदारसंघात बैठकींच्या सत्राची सुरुवात होते, परंतु इतर वेळी या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रक्रियेत घेतले जात नसल्याची ओरड वारंवार होते. दरम्यान, दानवे आणि खैरेंच्या गटबाजीत या बैठकींना किती कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजेरी लावतात, याकडे लक्ष लागले आहे.