औरंगाबाद: औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे वैर सर्वश्रृत आहे. अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकाही केल्या आहेत. पण, आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झालेला पाहायला मिळत आहे. औरंगाबादचे भावी खासदार चंद्रकांत खैरेच असणार आणि यापुढे जिल्ह्यातील सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवणार, अशी घोषणा सत्तार यांनी केली.
मंगळवारी सोयगाव नंगरपंचायतीत नगराध्यक्ष अन उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक पार पडली. यावेळी बोलत असताना सत्तार म्हणाले की, औरंगाबादचे भावी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार. यापुढील जिल्ह्यात सर्वच निवडणुका खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील व जिल्ह्याचे पक्षांच्या धोरणे आणि ध्येयचे निर्णयही तेच घेतील. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्यातील सेनेच्या इतर नेत्यांमध्ये खळबळ उडाली असल्याच्या चर्चा सुरू आहे.
सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनचे राजकारण ढवळून निघाल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. मंगळवारी सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सोयगावात आले होते निवडीच्या घोषणे नंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची थेट पेढेतुला करुन जिल्ह्याचा आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असतील अशी थेट घोषणा करून टाकली.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत सत्तार यांना त्यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे यावेळी दिसले. दुध संघाच्या निवडणुकीत झालेल्या सत्तार-भुमरे यांच्या वादाचे हे पडसाद असल्याच्या चर्चेलाही वेग आला होता. खैरे भावी खासदार असतील, या घोषणे सोबतच सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच सोयगावला स्वच्छ पाणी तसेच पायाभूत सुविधा व सोयगावच्या सर्वांगीण विकास साधण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक कमी पडणार नाही असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.